मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : वेरूळ येथील ओम जगदगुरु जनशांती धर्म सोहळ्यास भेट
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : अमर आढाव
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या अनुग्रहाने लाखो लोकांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली आहे.महाराजांनी नऊ वर्ष मौनव्रत धारण केले.त्यांचे सदगुरु कार्यही मोठ्या स्वरूपात आहे.संतांच्या शिकवणीमुळेच संस्कृती,धर्म प्रचाराचे कार्य सुरु आहे. देशात शांतीची स्थापन करुन आपला देश प्रगतीपथावर नेण्याचे कार्य पुर्णत्वास नेण्याचे सामर्थ्य अशा संतांच्या आशिर्वादात असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या ३६ व्या पुण्यस्मरणार्थ वेरुळ येथील आश्रमात ओम जगदगुरु जनशांती धर्म सोहळ्याचा प्रारंभ झाला. या भव्यदिव्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज व्यासपीठावर उपस्थितीत होते. आश्रमीय संत,आमदार प्रशांत बंब, सुदर्शन न्यूज चॅनलचे चेअरमन सुरेश चव्हाणके यांचीही यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७५१ कुंडात्मक यज्ञशाळा प्रवेश सोहळा तसेच भगवान शिवमूर्तिचे पूजन व उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमस्थळी येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा आशीर्वाद घेतला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित संत-महंत यांच्यावर देखील पुष्पवृष्टी केली. त्यानंतर आश्रमाच्या वतीने संत नागेश्वरानंद महाराज आणि संत अवीमुक्तेश्वरानंद महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत व पूजन केले. आपल्या
संबोधनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या सदगुरु कार्याचा गौरव केला.महाराजांनी नऊ वर्ष मौनव्रत धारण केलेले असताना देखील लाखोंच्या संख्येने समाजाला योग्य दिशा देण्याचे मोठे कार्य केले.जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या परंपरेला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
प्रभुश्रीमांच्या अयोध्या येथील मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आजच्याच शुभदिनी धर्मध्वज फडकविण्यात आला. आणि आजच जगदगुरु बाबाजींच्या पुण्यस्मरण सोहळ्याचा प्रारंभ होत आहे.हा मोठा योगायोग आहे.दरम्यान आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर,आश्रमीय संत,सोहळा कमिटी आणि हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद महाराज यांनी केले.
Comments are closed.