पुणे/एनजीएन नेटवर्क
नोकरी लावण्याचे आमिष दाखवत 44 जणांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर सहा महिन्यांनी दराडेंना अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फसवणूक केल्याच्या आरोपांखाली दराडेंची चौकशी सुरु होती. शैलजा यांच्याविरोधात अनेकांनी फसवणुकीची तक्रार केली होती.
दराडेंना सोमवारी चौकशीसाठी हडपसर पोलिसांनी बोलावले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान यापुर्वी त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) याला अटक करण्यात आली आहे. दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात संगनमत करून फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. यापूर्वी परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंवर गुन्हा दखल करणा-या तक्रारदाराला, हायकोर्टानं 50 हजारांचा दंड ठोठावला होता. तक्रारदार स्वत: शिक्षक आहे. दराडेंनी नोकरीचं आमिष दाखवून आपल्याकडून पैसे घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.
आधी सुपे, आता दराडे
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे जेरबंद झाल्यानंतर परीक्षा परिषदेचे आयुक्तपद होते. या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार शैलजा दराडे यांच्याकडेच सोपविण्यात आला. दराडे या उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळत होत्या. परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था आहे. यावर कोणाचेही फारसे नियंत्रण नसल्यामुळे परिषदेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला होता. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे जेलमध्ये गेले. यानंतर आता शैलजा दराडे यांना देखील फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे.