महावितरण नाशिक व जळगाव परीमंडळातील खेळाडू व संघांचा सहभाग
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिक आणि जळगांव संयुक्त परिमंडलाचा संघ व खेळाडू निवडण्यासाठी निवड चाचणी स्पर्धा बुधवार (१५ ऑक्टोबर) रोजी नाशिक हिरावाडी येथील कै. मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची खेळाडूवृत्ती, संघभावना वृद्धिंगत व्हावी आणि निरोगी आरोग्य रहावे यासाठी दरवर्षी महावितरणच्या क्रीडा स्पर्धा होत असतात.
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मुख्य कार्यालयासह राज्यभरातील एकूण १६ परिमंडलांचे ८ संघ या राज्यस्पर्धेत सहभागी होतात. यावर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अमरावती येथे आयोजित करण्यात आल्या असून या निवड चाचणीतून अंतिम निवड झालेले नाशिक व जळगांव परिमंडलाचा संयुक्त संघ व खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहे. यामध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, कुस्ती, वेट लिफ्टिंग, थाळी फेक, भाला फेक, गोळा फेक, धावणे, उंच उडी, लांब उडी, बॅडमिंटन, टेनि क्वाइट, बुद्धिबळ, कॅरम व ब्रिज या १८ प्रकारातील संघ व खेळाडू निवडीसाठी दोन्ही परिमंडलातून जवळपास २५० खेळाडू या निवड चाचणीत सहभागी झाले होते.
उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी केले तर प्रास्ताविक समीर वडजे यांनी तर आभार जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी मानले.
उद्घाटन प्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे, कार्यकारी अभियंता चेतन वाडे, वरिष्ठ व्यवस्थापक मुरलीधर गवळी, व्यवस्थापक हेमंत भामरे, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी रेड्डी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण धनाईत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.