नाशिक/एनजीएन नेटवर्क
हिरव्या रंगाच्या पेहरावातील सौंदर्यतारका.. हिरव्या पाना-फुलांच्या दागिन्यांचा साज.. आत्मविश्वासदर्शक राम्प वॉक.. एकाहून एक सरस उखाण्यांची मालिका.. जुन्या-नव्या संस्कृती दर्शक बहारदार मंगळागौर खेळांचे सादरीकरण आणि बक्षिसांची रेलचेल उपस्थितांना एका अनोख्या आणि संस्मरणीय सोहळ्याची अनुभूती देवून गेले. तब्बल चार तास चाललेला हा सोहळा म्हणजे मंतरलेल्या कलाविष्काराचे देखणे स्वरूप राहिले.
निमित्तं होते ‘स्वयंसिद्धा बहुद्देशीय संस्थे’च्या वतीने आयोजित ‘श्रावण सरी’ सोहळ्याचे. गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात रविवारी त्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्यात हिरव्या साजसह राम्प वॉक, उखाणा आणि मंगळागौर खेळांच्या एकत्रित स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला ‘स्वयंसिद्धा’ सदस्य आणि इतर महिलांनी उत्स्फूर्त सहभागासह प्रतिसाद दिला.
हळदी-कुंकू, मेहंदी कोन, सजवलेला झुला आकर्षण ..
या सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक सदस्य महिलांचे हळदी-कुंकू, मेहंदी कोन देवून स्वागत करण्यात आले. याशिवाय, सजवलेला झुला सगळ्यांच्याच आवड आणि आकर्षणाचा भाग ठरला. त्यावर बसून अनेक सदस्यांनी स्वतःसह ग्रुपची छायाचित्रे आपापल्या स्मार्टफोन मध्ये बंदिस्त केलीत.
दीपप्रज्वलनाने श्रीगणेशा..
या सोहळ्याचा दिमाखदार प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. ज्येष्ठ कलावंत मृणाल कुलकर्णी, सुप्रसिद्ध लेखिका स्मिता सौंदाणकर, चंदूकाका सराफ एन्ड सन्स सराफ पेढीचे ग्राहक संबंध व्यवस्थापक (सीआरएम) मंगेश पंचाक्षरी तसेच निलेश शिंदे आणि गजानन बार्गजे, ‘स्वयंसिद्धा बहुद्देशीय संस्थे’च्या समन्वयक रुक्मिणी जोशी आणि मानसी सजगुरे यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविकात मिलिंद सजगुरे यांनी संस्थेच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेत लाभलेल्या उदंड प्रतिसादाची चर्चा केली.
‘राम्प वॉक’ मध्ये भारती शिंदे सरस..
प्रारंभी ‘राम्प वॉक’ स्पर्धा घेण्यात आली. सहभागी स्पर्धकांनी हिरव्या रंगाचा पेहराव करून चित्तवेधक हिरव्या पाना-फुलांच्या दागिन्यांचा साज चढवला होता. सर्वांच्या चालीमधून आत्मविश्वास आणि आनंद जणू ओसंडून वाहत होता. यासाठी सादरीकरण, पेहराव, चाल, देहबोली आदी निकष ठेवण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पंधराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये भारती शिंदे (प्रथम), उज्ज्वला भामरे (द्वितीय) आणि स्नेहा शिंपी (तृतीय) यांनी बाजी मारली. भारती शिंदे यांना अतिथींच्या हस्ते मानाचा मुकुट आणि स्यशे प्रदान करण्यात आला. तीनही विजेत्यांना चंदूकाका सराफ एन्ड सन्स सराफ पेढीच्या वतीने आकर्षक गिफ्ट देवून गौरवण्यात आले.
‘उखाणा स्पर्धे’त नयना सूर्यवंशी विजेत्या..
सादरीकरण, नाती जपणूक आणि सामाजिक संदेश या निकषांवर आधारित ‘उखाणा स्पर्धे’तही स्पर्धकांचा लक्षणीय संख्येत सहभाग राहिला. या स्पर्धेत नयना सूर्यवंशी (प्रथम), प्राजक्ता देशपांडे (द्वितीय) आणि अश्विनी दामले (तृतीय) यांनी परीक्षकांची पसंती मिळवली. तीनही विजेत्यांना चंदूकाका सराफ एन्ड सन्स सराफ पेढीच्या वतीने आकर्षक गिफ्ट देवून गौरवण्यात आले.
मंगळागौर खेळ स्पर्धेमध्ये ‘यशश्री ग्रुप’चे वर्चस्व..
या सोहळ्यातील सर्वाधिक आकर्षक आणि उत्कंठावर्धक स्पर्धा प्रकार राहिला तो मंगळागौर खेळांचा. सहभागी संघांनी जुन्या-नव्या गीत रचनांची मैफल सजवत उपस्थितांची वाहवा मिळवली. तब्बल दीड तास चाललेल्या या स्पर्धेमुळे सभागृहातील वातावरण वेगळ्या सांस्कृतिक उंचीवर पोहचले होते. या स्पर्धेमध्ये समन्वय, एकजिनसीपण, मंगळागौर मूळ संकल्पना आणि दिलेली वेळ हे निकष निर्णायक ठरले. यामध्ये इंदिरानगर, नाशिक येथील ‘यशश्री ग्रुप’ ने बाजी मारली. यामध्ये मनीषा पाठक, रुपाली तांबट, श्रुती अपसिंगकर, जयश्री गोगटे, पूजा गज्जर, जयश्री देवते, दिपाली परदेशी, गौरी ढवळे आणि आर्य देवळे (तबला) यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अशोका मार्ग, नाशिक येथील मैत्रीण ग्रुपला प्राप्त झाले. यामध्ये शुभा संत, रुचा कुलकर्णी, अश्विनी सालशिंगीकर, कविता डोलारे, योगिनी काटे, संगीता चव्हाण, अस्मिता जोशी, स्वाती करपटे, मृणाल कुलकर्णी, रोशनी बकरे, वंदना सुपे आणि हर्षाली कुलकर्णी यांचा सहभाग राहिला. स्पर्धेतील तृतीय बक्षीस रॉकिंग स्टार ग्रुपच्या वाटेला गेले. या ग्रुपमध्ये गुणाली सावंत, आद्या माने, विजया माने, सुप्रिया सावंत, नीलम सावंत, ज्योती कासार, संगीता कासार, पूनम गुळवे, प्रियांका काटकर, शुभांगी नायर आणि प्रतिमा चौधरी या कलाकार सहभागी झाल्या. तीनही विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे देवून अतिथींच्या हस्ते गौरवण्यात आले.
नि:पक्ष, पारदर्शी परीक्षण..
सोहळ्यातील तीनही स्पर्धांचे परीक्षण ज्येष्ठ कलावंत मृणाल कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध लेखिका स्मिता सौंदाणकर यांनी केले. त्यांच्या नि:पक्षपाती आणि पारदर्शी परीक्षण पद्धतीचे उपस्थितांनी कौतुक केले.
प्रेरणा बेळे, डॉ. प्राजक्ता लेले यांची विशेष उपस्थिती..
दरम्यान, या सोहळ्याला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रेरणा बेळे आणि सुप्रसिद्ध समुपदेशक डॉ. प्राजक्ता लेले यांची विशेष उपस्थिती लाभली. या दोन्ही विशेष अतिथींसह चंदूकाका सराफ एन्ड सन्स सराफ पेढीचे निलेश शिंदे आणि गजानन बार्गजे यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली. याप्रसंगी प्रेरणा बेळे यांनी वाढत्या पाश्चिमात्य संस्कृती वर्चस्वाची चर्चा करीत त्याचा भारतीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण करून उत्तर देण्याची गरज प्रतिपादन केली. डॉ. लेले यांनी लोप पावत चाललेल्या भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकत समाजाने त्याबाबत सावध होणे गरजेचे असल्याचे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले.
ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालन भावले…
या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन आकाशवाणीच्या निवेदिका पल्लवी कुलकर्णी यांनी केले. त्यांच्या ओघवती शैली, समयसूचकता आणि शब्द्फेकीने सोहळ्याची रंगत वाढवली. त्यांचे सूत्रसंचालन उपस्थितांना चांगलेच भावले.
चंदूकाका सराफ एन्ड सन्स सराफ पेढी ‘गिफ्ट पार्टनर’
‘स्वयंसिद्धा बहुद्देशीय संस्थे’च्या वतीने आयोजित ‘श्रावण सरी’ सोहळ्याचे ‘गिफ्ट पार्टनर’ म्हणून महाराष्ट्रातील ख्यातकीर्त चंदूकाका सराफ एन्ड सन्स सराफ पेढीने भूमिका वठवली. या पेढीच्या वतीने ‘राम्प वॉक’ आणि उखाणा स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरवण्यात आले.
‘या’ सदस्य ठरल्या ‘भाग्यवान विजेत्या’..
सदर सोहळ्यासाठी आलेल्या महिला भगिनींसाठी चंदूकाका सराफ एन्ड सन्स सराफ पेढीच्या वतीने एकत्रित कुपन्स मधून भाग्यवंत सोडत काढण्यात आली. यामध्ये मोनालिसा डिसुझा, आरती कुलकर्णी आणि रमा घरोटे या भाग्यवान विजेत्या ठरल्या. त्यांना पेढीच्या वतीने निमंत्रित करण्यात येवून सन्मानित करण्यात येणार आहे.
सोहळ्याला यांचा हातभार..
‘श्रावण सरी’ सोहळा अत्यंत देखणा आणि उपस्थितांना खिळवून ठेवणारा ठरला. हा सोहळा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी पल्लवी पाठक, स्नेहा शिंपी, योगिता बागुल यांचे सहकार्य लाभले.