छ. संभाजीनगर/एनजीएन नेटवर्क
मराठवाड्यात एका टोळीने दामदुप्पटीचा स्कॅम करत लोकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. या टोळीने गावोगावी एजंट नेमले. स्वस्तात अन्नधान्य, अत्यंत कमी दरात इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन, लॅपटॉप देण्याचं आमिष दाखवलं, इतकच नाही तर विधवा महिलांना पेन्शन देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडूनही पैसे उकळले. प्रत्यक्ष परतावा देण्याची वेळ आली तेव्हा या भामट्यांनी हात वर केले. लुटीच्या या गोरखधंद्याने मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. ही लूट एक दोन कोटींची नाही तर तब्बल 100 कोटींची लूट आहे.
नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि जालन्यात यासाठी जवळपास 700 एजंट नेमण्यात आले. महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र, जनकल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अशा नावांचा वापर करून लोकांना स्वस्तात धान्य, स्वस्तात शिलाई मशीन, अत्यंत माफक दरात इलेक्ट्रीक बाईक देण्याचे आमिष दाखवण्यात आले. लोकांचा विश्वास संपादित करण्यासाठी सुरूवातीला थोड्याफार प्रमाणात अन्नधान्यही देण्यात आले. नंतर मात्र या स्वप्न दाखवणा-या या टोळीनने शेकडो लोकांना हातोहात गंडवल्याचे उघड होताच अनेकांची पाचावर धारण बसली. या टोळीनं 100 कोटींपेक्षा जास्त लूट केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 13 आरोपींपैकी तीन जणांना अटक केलीय. राजकुमार सुतारे, भीमराव वाघमारे, नरेश इंगोले, संतोष गच्चे अशी मुख्य आरोपींची नावं आहेत.