मुंबई/एनजीएन नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणामध्ये शिंदे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली होती. याच याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने संबंधित प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी 2 आठवड्यांमध्ये लेखी उत्तर द्यावे असे कोर्टाने म्हटले आहे.
आमदार अपात्रततेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले होते. या सुनावणीला आता तीन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.