सुरगाणा : वाजीद शेख
गुजरातमधील एकमेव तसेच अत्यंत लोकप्रिय असलेले थंड हवेचे हिल स्टेशन असलेल्या सापुतारा येथे रविवार पासून ‘सापुतारा मॉन्सून फेस्टिव्हल २०२५’चा रंगतदार शुभारंभ झाला. राज्याचे पर्यटन, सांस्कृतिक,वन,पर्यावरण व हवामान बदल विभागाचे कॅबिनेट मंत्री मुलुभाई बेरा व डांग जिल्ह्याचे प्रभारी मंत्री कुंवरजीभाई हलपती यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य महोत्सवाची सुरुवात झाली.
या उत्सवाचे उदघाटन मंत्री मुलुभाई बेरा यांच्या हस्ते झाले. या महोत्सवात १७ ऑगस्ट पर्यंत दररोज नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘एक भारत,श्रेष्ठ भारत’ थीमवरील परेड,सांस्कृतिक व संगीत महफिली,आदिवासी कला, संस्कृती, कलेच्या कार्यशाळा,साहसी व नैसर्गिक पर्यटन,स्थानिक खाद्यपदार्थ, रेन डान्स, सेल्फी पॉईंट आदी आकर्षणे समाविष्ट आहेत. मंत्री मुलुभाई बेरा यांनी आपल्या भाषणात कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा देत केंद्र सरकारच्या पर्यटन विषयक धोरणांमुळे गुजरातमध्ये पर्यटनाने घेतलेली उतुंग झेप अधोरेखित केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे गुजरात पर्यटन जागतिक स्तरावर पोहोचले आहे. २००६ सालापासून गुजरातमध्ये पर्यटनवर्ष साजरे करून राज्याला एक आगळी ओळख मिळवून दिली आहे.”
मंत्री बेरा यांनी “अतिथी देवो भव” या भावनेने प्रेरित होऊन सापुतारा फेस्टिव्हलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा व सुरक्षा सुनिश्चित करण्याबाबतही माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी पर्यटकांना ‘लोकल फॉर व्होकल’ मोहिमेला पाठबळ देत स्थानिक कृषी उत्पादनं व हस्तकला वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले.
प्रभारी मंत्री कुंवरजीभाई हलपती यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सापुतारा हे पूर्वी एक छोटेसे गाव होते, मात्र आज हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. सरकारकडून आदिवासी बांधवांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली असून, पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळून रोजगारालाही चालना मिळत आहे.” उदघाटन समारंभात १३ राज्यांतील ११० कलावंतांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोरिओग्राफरच्या नेतृत्त्वात विविध पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले. विशेष आकर्षण ठरले स्थानीय कलाकारांचे डांगी नृत्य, ज्याने उपस्थित पर्यटकांचे मन जिंकले.
या भव्य कार्यक्रमास डांग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाबेन गाईन, सांसद धवलभाई पटेल, आमदार विजयभाई पटेल, माजी आमदार नरेश पटेल, आणि पर्यटक विभागाचे अधिकारी, प्रशासकीय पदाधिकारी, तसेच मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि नागरिक उपस्थित होते. सापुताराचे निसर्गसौंदर्य, समृद्ध संस्कृती आणि राज्य शासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या मॉन्सून फेस्टिव्हलचे स्वरूप दरवर्षी अधिक भव्य होत आहे.
प्रतिक्रिया-” आदिवासी कला संस्कृती मध्ये सुरगाणा तालुक्यातील’ तातापाणी भोवाडा कलापथक सहभागी झाले असून या महिनाभर चालणा-या मान्सून फेस्टिव्हल मध्ये मी हस्तकौशल्यच्या माध्यमातून कागदी लगद्यापासून तयार केलेले पर्यावरण पूरक मुर्ती रामायण, महाभारतातील देवदेवतांच्या प्राणी,पशू,पक्षी,जलचर आदींच्या प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्याचा आल्या आहेत. गुजरात सरकारने माझ्या या कलेला सरदार सरोवर स्टॅच्यू आॅफ युनिटीच्या उद्घाटन समारंभातील सांस्कृतिक कार्यक्रम,बडोदा म्युझियम, प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली या कार्यक्रमात बोहाडा सोंगी मुखवटे कला सादर केली आहे. परंतु महाराष्ट्र शासन आदिवासी पर्यटन महामंडळ हे या बोहाडा लोककले कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. हे सोंगे जतन व संवर्धन करायला, ठेवायला एक सांस्कृतिक भवनाची साधी मागणी गेली कित्येक वर्षे मी तरी आहे. ती अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. दुसरीकडे अनेक ठिकाणी सांस्कृतिक भवन आदिवासी विकास विभागाने बांधले आहेत. ती ओस पडून भकास झाली असून बहुतेक ठिकाणी त्या सांस्कृतिक भवन इमारतीचा गैरवापर होत आहे. शासनाने माझ्या कलेला दाद द्यावी हीच माफक अपेक्षा.
शिवराम चौधरी, माजी सैनिक
बोहाडा लोककला सोंगी मुखवटे कलाकार, पिंपळसोंड.
Comments are closed.