नाशिक/एनजीएन नेटवर्क
उच्च गुणवत्तेच्या तसेच रोगमुक्त संत्रा, मोसंबी, लिंबू पिकांतील महत्वाचे कलम निर्मितीचे तंत्रज्ञान नागपूरच्या केंद्रीय लिंबुवर्गीय संशोधन संस्थेने विकसित केले आहे. यातून सक्षम, निरोगी व दर्जेदार रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी या उद्देशाने सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी व केंद्रीय लिंबुवर्गीय संशोधन संस्था (सीसीआरआय) यांच्यात नागपूर येथे शनिवारी (ता.15) रोपवाटिका तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय रस्ते, महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी, संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष, सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, संचालक मनोज जवंजाळ हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की, संत्रा, मोसंबी, लिंबू या फळांचा दर्जा राखण्यात गुणवत्तापूर्ण रोपांची भूमिका महत्त्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे तंत्रज्ञान अशा रोपांच्या निर्मितीत सहाय्यभूत ठरणार आहे. जास्तीत जास्त रोपवाटिकाधारकांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
रोगमुक्त कलमांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याकरिता सीसीआरआयकडून अधिस्वीकृती दिली जाते. या पार्श्वभूमीवर लिंबूवर्गीय संशोधन संस्था तसेच सह्याद्री फार्म यांच्यात रोपवाटिका तंत्रज्ञान हस्तांतरण विषयक सामंजस्य करार पार पडला. सह्याद्री फार्मकडून येत्या काळात संत्रा रोपांची उपलब्धता करून दिली जाणार आहे.