NGN News
Latest Marathi News

संजय होळकर यांची एनएचआरडीएफ संचालकपदी बिनविरोध निवड

लासलगाव : राकेश बोरा

लासलगाव येथील भाजीपाला व फळबाग सहकारी खरेदी-विक्री संस्था (वेफको) चेअरमन  संजय चांगदेवराव होळकर यांची नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (एनएचआरडीएफ), नवी दिल्ली या देशपातळीवरील प्रतिष्ठित संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ही निवड एनएचआरडीएफ ची १८१ वी मॅनेजिंग कमिटी बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे डॉ. बिजेन्द्रसिंग चेअरमन , चौधरी सुखबिरसिंह पवार (उपाध्यक्ष, एनएचआरडीएफ), चंद्रपाल सिंग यादव  आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री मोहनभाई कुंदरीया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.संजय होळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून कृषी व शेतकरी हितासाठी कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वगुणांना व कृषी क्षेत्रातील योगदानाला अनुसरूनच ही निवड झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

एनएचआरडीएफ ही संस्था देशभरात कांदा, लसूण व इतर भाजीपाला उत्पादनाच्या संशोधनासाठी कार्य करते. शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, उत्पादनवाढ व प्रक्रिया उद्योगासाठी ती मार्गदर्शन करते. अशा संस्थेच्या संचालकपदावर लासलगावसारख्या कृषिप्रधान भागातील प्रतिनिधीची निवड होणे ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.

होळकर यांच्या निवडीनंतर लासलगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून त्यांचे जोरदार स्वागत व अभिनंदन होत आहे. शेतकरी, सहकारी क्षेत्रातील नेते, व्यापारी, आणि विविध सामाजिक संघटनांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.