NGN News
Latest Marathi News

युद्धाची झळ कमी करण्यासाठी समर्थ सेवेकऱ्यांची अध्यात्मिक सेवा

  • प्रत्यंगिरा मातेस चंडी यागाच्या माध्यमातून साकडे

** एनजीएन न्यूज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : सध्या सुरू असलेल्या अमेरिका,इसराइल आणि इराण युद्धामुळे जगभर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थितीचा सामना भारतातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना करावा लागतो आहे.या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसली असून यातून तिसऱ्या महायुद्धाची जणू सुरुवातच झाली असून खरोखरच तिसरे महायुद्ध पेटले तर संपूर्ण मानव जातीचा आणि जीवसृष्टीचा संहार व्हायला वेळ लागणार नाही म्हणूनच श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून विशेष अध्यात्मिक सेवा हाती घेण्यात आली असून देशभरातील लाखो सेवेकरी प्रत्यंगिरा मातेस चंडी यागाच्या माध्यमातून साकडे घालत असून हे युद्ध लवकरात लवकर थांबावे आणि संपूर्ण मानव जातीची या निमित्ताने होणारी वाताहातही थांबावी व पुन्हा जगभर शांतता नांदावी अशी साकडे माता भगवतीस सेवेकरी घालत आहेत.जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी यात सहभागी होऊन भारत मातेची सेवा करावी असे आवाहन गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी केले.

आज त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने 25000 हून अधिक महिला पुरुष सेवेकरी उपस्थित होते. तेव्हा सेवेकऱ्यांच्या अभिष्टचिंतनाचा स्वीकार केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधताना गुरुमाऊली बोलत होते. याआधी कारगिल युद्ध असो की हॉटेल ताज वरील अतिरेक्यांचा भ्याड,भयानक हल्ला असो,दुष्काळ,जलप्रलय, अतिवृष्टी,वेगवेगळ्या आजारांच्या साथी अशी भयानक संकटे आली तेव्हा सेवेकर्‍यांनी एकत्र येऊन विविध स्वरूपाची आध्यात्मिक सेवा मोठ्या प्रमाणात रुजू केली व त्याचे चांगले परिणाम वेळोवेळी दिसून आले. म्हणूनच आता पुन्हा एकदा देशभरातील लाखो सेवेकर्‍यांनी एकत्र येऊन माता भगवतीस हे साकडे घालावयाचे आहे आणि आपल्या सर्वांची माता आपल्या हाकेस होऊ देऊन निश्चितच धावून येईल आणि हे युद्ध सुद्धा लवकरच थांबेल आणि संपूर्ण जगभर शांतता नांदेल असा विश्वासही गुरुमाऊलींनी व्यक्त केला. याप्रसंगी सौ मंदाकिनी मोरे,चंद्रकांत दादा मोरे,नितीन भाऊ मोरे आणि सतीश मोटे हे उपस्थित होते.

आज सकाळपासून त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात राज्यभरातून आलेल्या महिला पुरुष सेवेकर्‍यांनी गर्दी केली होती.सकाळी आरती झाल्यानंतर सेवेकर्‍यांच्या वतीने गुरुपीठ परिसरात एक छोटेखानी मिरवणूक काढण्यात आली यात राज्यभरातून आलेल्या महिला सेवेकर्‍यांनी सादर केलेले लेझीम तसेच टाळ नृत्य आकर्षणाचे केंद्र ठरले. मुख्य कार्यक्रमात गुरुमाऊलींची ग्रंथ तुला करण्यात आली व या ग्रंथांचे सेवेकर्‍यांना मोफत वाटप करण्यात आले. सौ मंदाकिनीताई मोरे यांनी त्यांचे औक्षण केले. पंढरपूर व आळंदी देवस्थान, संजीवनी साखर कारखाना, बँक ऑफ महाराष्ट्र या व इतर 25 संस्थांनी गुरुमाऊलींचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. वेदमूर्ती विजयआप्पा शिखरे यांनी शांती मंत्राचे पठण तर मुकुंदराव कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Comments are closed.