नाशिक/एनजीएन नेटवर्क
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य शासनाच्या वतीने “उद्योगरत्न” पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली, यामध्ये नाशिकमधील सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांना मराठी उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पहिल्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांची निवड करण्यात आली असून, ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे आदर पुनावाला यांना उद्योगमित्र, किर्लोस्कर उद्योग समुहाच्या संचालिका गौरी किर्लोस्कर यांना महिला उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी केली. सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांना जाहीर झालेला पुरस्कार हा शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीचा सन्मान आहे. एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून जागतिक दर्जाची संस्था म्हणून आज सह्याद्री फार्म्स नावारूपास आली आहे. सह्याद्री आजमितीस भारतातील सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणारी व विविध फळपिकात प्रक्रिया करणारी कंपनी म्हणून नावारूपास आलेली आहे. मोहाडी, तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे सुमारे १२० एकराच्या विस्तीर्ण भूमीवर सह्याद्री फार्म्सने उभारलेला अत्याधुनिक एकात्मिक प्रकल्प त्यामधील सुविधा आणि यंत्रणा यांच्या आधारे ताजा शेतीमाल आणि प्रक्रियायुक्त शेती उत्पादने यांची ४२ देशांमध्ये मोठया प्रमाणात निर्यात करून जवळपास ६००० लोकांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात सह्याद्री फार्म्स यशस्वी झाली आहे.
२० ऑगस्टला वितरण ..
२० ऑगस्टला वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आदींच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
————————
@ हा पुरस्कार म्हणजे माझा एकट्याचा सन्मान नसून सर्व शेतकऱ्यांचा सन्मान आहे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन उद्योजक म्हणून एकत्रित काम केले तर नक्कीच शेती आणि ग्रामीण भागात सकारात्मक बदल होऊ शकतो याची मला खात्री आहे. तोच प्रयत्न आम्ही सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून करत आहोत त्यातून आम्हाला सकारात्मक बदल जाणवत आहे.
– विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स.