** एनजीएन नेटवर्क
शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी ह्यांचे रविवारी पहाटे १.४५ मिनिटांनी वयाच्या ८८ व्या वर्षी देहावसान झाले. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना मास्टर टीचर मिलेनियम , भारतरत्न लता मंगेशकर हयांच्या हस्ते विद्या सरस्वती अॅवॉर्ड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र भूषण अॅवार्ड , ज्ञानहिरा , राजीव गांधी फांऊडेशन चा शांतता पुरस्कार , मॅन ऑफ द इयर , नाशिक भूषण व फलटण भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
आपल्या शैक्षणिक कारकीर्दीची सुरवात त्यांनी बी .वाय के महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी घेऊन झाली. व पहिल्याच दिवशी कवी कुसुमाग्रजांचा ‘ प्राचार्यांचे प्राचार्य व्हा’, असा आशीर्वाद त्यांना मिळाला. हे आशीर्वाद सरांनी आपल्या कार्यातून सार्थ केले. प्रभावी अध्यापना बरोबरच त्यांनी अविरत मनन, संशोधन चिंतन ह्यातून जवळपास ५० हून अधिक ग्रंथ संपदा निर्माण केली व १०० हून अधिक पुस्तकांचे संपादन केले. व्यवस्थापन विषयात अमूल्य संशोधन करून पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन ह्या विषयातील पदवी सर्व प्रथम प्राप्त करणण्याचा बहुमान त्यांना मिळाला. वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षणा बरोबरच सरांनी संस्कृत , मराठी , हिंदी व जर्मन ह्या भाषांचे ही सखोल अध्ययन केले. व साहित्याचार्य , साहित्य प्राज्ञ, साहित्य विषारद ह्या पदव्या ही विशेष प्राविण्या सहित प्राप्त केल्या. सर्वात तरुण प्राचार्य व ३७ वर्षाचा सर्वाधिक कालखंड पूर्ण करणारे प्राचार्य म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील सार्थ योगदानाला ६५ वर्षे पूर्ण झाली होती.
संस्थेच्या सचिव पदाची व नंतर महासंचालक पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. व खऱ्या अर्थाने गोखले एज्युकेशन सोसायटीचा विकास व विस्तार झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण व दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी गोखले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. व त्यांच्या साठी शिक्षणाची कवाडे खुली केली होती. सामाजिक विकासासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे, हा विश्वास ठेवून त्यांनी स्वतःला शिक्षणाच्या प्रचार – प्रसारासाठी आजीवन वाहून घेतले होते. शिक्षण क्षेत्रात स्वयं प्रकाशित, तेजस्वी ताऱ्या प्रमाणे आलोकित राहून समाजासाठी प्रकाश वाटा तयार करणाऱ्या ह्या ज्ञान सूर्याला विनम्र अभिवादन.
- प्रा. छाया लोखंडे