त्र्यंबकेश्वर/रवींद्र धारणे
श्रावण महिना म्हटला की आठवते ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, गेले अधिक श्रावण व निज श्रावण महिण्यात लाखो भाविकांनी प्रदक्षिणा पुर्ण केली. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी तर एक लाखांपेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा केली. पुर्वीच्या काळातील प्रदक्षिणेमधील सात्विकता आता कमी होऊ लागलेली आहे. पुण्यकारक प्रदक्षिणेला आता फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वेळीअवेळी प्रदक्षिणेला निघणे. याबरोबरच सोबत दारूच्या बाटल्या, गुटक्याची पाकिटे नेणे असे प्रकार वाढत आहे. प्रदक्षिणा मार्गावर सापडणाऱ्या दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, गुटक्यांचे तसेच खाद्य पदार्थाचे वेष्टन यामुळे ब्रह्मगिरीच्या परिसराची अक्षरक्ष: वाट लागते. एवढेच नसुन हा कचरा परिसरातील शेतीलाही नुकसानकारक ठरतो. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका सेवा कार्य विभागाच्या वतीने गेल्या सात वर्षापासुन तिसर्या सोमवार नंतर दुसर्या दिवशी संपुर्ण प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता मोहिम सुरु केली जाते.
सकाळी ८ वाजता सर्व स्वयंसेवक सुधीर शिखरे यांच्या रेणुका हाॅलवर जमले. स्वयंसेवकाच्या वेगवेगळ्या टिम तयार करून त्यांना ठराविक अंतर ठरवुन दिले. रस्त्याच्या दुतर्फा असलेला सर्व कचरा उचलून व गोण्यांमध्ये भरून पिकअप ट्रॅक्टरद्वारे वाहून आणण्यात आला. तीन ट्रॅक्टर प्लास्टिक कचरा, तीन पिकअप पिण्याच्या बाटल्या, चार पोते काचेच्या अर्थात बियर, दारुच्या बाटल्या जमा करण्यात आल्या. हा कचरा नगर परिषदेच्या डम्पींग ग्राऊंडवर जमा करण्यात आला.
या उपक्रमासाठी जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, सारस्ते, तोरंगण-हरसूल, खरशेत, निरगुडे, सावरपाडा, हेदपाडा, देव डोंगरा, नाशिक आदी ठिकाणांवरुन आलेल्या २६० स्वयंसेवकांनी श्रमदान केले. या कार्यक्रमासाठी नाशिक येथील मारवाडी युवा मंच या संस्थेने हॅन्ड ग्लोज, डॉ.सारंग ईंगळे यांनी पाचशे डिस्पोजेबल बॅग, त्र्यंबकेश्वर देवस्थानने ३०० पाण्याच्या बाटल्या दिल्या. तसेच त्र्यंबकेश्वर मधील सुजाण नागरिकांचे अनमोल सहकार्य मिळाले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी नाशिक जिल्हा संघचालक साहेबराव पाटील , जिल्हा कार्यवाह अरूण मोरे , त्र्यंबकेश्वर नगर परिषद, त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशन, तहसीलदार कार्यालय यांच्याकडून अनमोल सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. स्वयंसेवकांना रक्षाबंधन करून समारोप झाला. या उपक्रमासाठी शासनाने काही मदत केल्यास हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येईल, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती.