NGN News
Latest Marathi News

संघाने संस्काराची शिदोरी देऊन असामान्य व्यक्तिमत्व घडवली : प्रकाश पाठक

ॲड. मिलिंद चिंधडे लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा’ पुस्तक प्रकाशित

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामान्य व्यक्तींना संस्काराची शिदोरी देऊन त्यांच्या मधून असामान्य व्यक्तिमत्व घडवली. अनेक विधायक कार्य उभारली. संघाने माणसा-माणसांमधील आंतरिक प्रेरणा जागवून विधायक राष्ट्रकार्याची उभारणी केली त्यामुळे माणसे हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. अशा व्यक्तींचे गुणवर्णन या पुस्तकात आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाश पाठक यांनी ॲड. मिलिंद चिंधडे लिखित ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा ” या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात नुकतेच केले.

कार्यक्रमात प्राध्यापक हेरंब गोविलकर म्हणाले की भावी पिढ्यांसाठी हे पुस्तक स्फूर्ती देणारे आहे. समाजात संघाचे कार्य उभे करणाऱ्या स्वयंसेवकांच्या आठवणींना या पुस्तकामुळे उजाळा मिळतो. सख्ख्या नात्या पलिकडे नाती निर्माण करण्याचे काम संघाने केले. श्रीराम महाजन यांनी पुस्तकातून संघासाठी जीवन वेचलेल्या व्यक्तींच्या स्मृतींना जागवण्याचे काम पुस्तकाने केले आहे.

डॉक्टर बेलगावकर यांनी या पुस्तकातील सगळेच्या सगळे 46 व्यक्ती लेख वाचनीय आहेत आणि उरलेले चार लेख या पुस्तकाचा कळसाध्याय आहे. ते प्रत्यक्ष पुस्तक विकत घेऊनच श्रोत्यांनी वाचावे असे सांगितले. पुस्तकाचे लेखक ॲड. मिलिंद चिंधडे त्यांच्या मनोगतात म्हणाले की संघाचे कार्य हे ईश्वरी कार्य आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून हे कार्य पुढे आणण्याची संधी मिळाल्याचे ते म्हणाले. पुस्तकात समावेश असलेले 32 स्वयंसेवक आज हयात नाहीत पण हे पुस्तक म्हणजे संघकार्यासारख्या विधायक कामांमध्ये योगदान देणाऱ्या संघ स्वयंसेवकांना एका प्रकाराने ही श्रद्धांजलीच आहे.

याप्रसंगी चिंधडे परिवारातर्फे सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि इंदिरानगर येथील सर्वात्मक वाचनालय यांना पुस्तक संच भेट देण्यात आले.यावेळी व्यासपीठावर प्रकाशक वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार, भोसलाचे माजी सरकार्यवाह डॉक्टर दिलीप बेलगावकर, चार्टर्ड अकाउंटंट हेरंब गोविलकर, श्रीराम महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. गायत्री बापट यांनी सूत्र संचालन केले तर सौ. रसिका चिंधडे हिने स्वागत गीत सादर केले.

कार्यक्रमाला सायं. दैनिक भ्रमरचे श्री चंदुलाल शहा, प्रा. डॉ. यशवंत पाटील, प्राचार्य कुलकर्णी सर, राजकीय क्षेत्रातील श्री सतीश शुक्ल,श्री अजिंक्य साने, श्री लक्ष्मण सावजी, सामाजिक क्षेत्रातील श्री अनिल चांदवडकर, श्री सुरेश गायधनी, श्री देवदत्त जोशी, श्री विलासराव टिळे, श्री रमेश देशमुख, सौ निशिगंधाताई मोगल आणि श्री राजाभाऊ मोगल, श्री मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, अध्यात्मिक क्षेत्रातील मुंबईच्या प्रिया मालवणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.