नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी नाशिक येथे वसतिगृहाचे बांधकाम व्हावे अशी धनगर समाजाची मागणी होती. विजय हाके अध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी एजूकेशन फोरम, धनंजय माने, बापूसाहेब शिंदे, किरण थोरात हर्षद बुचडे यांनी धनगर समाजाची ही मागणी आ. देवयानी फरांदे यांच्याकडे करून यासाठी निधी देण्याची विनंती केलेली होती. नाशिक मध्य विधानसभेतील डेअरीच्या जागेवर वस्तीगृह प्रस्तावित करण्यात येऊन यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सचिव समितीच्या बैठकीत धनगर समाजाच्या वस्तीगृहाला मान्यता देण्यात येऊन यासाठी 43 कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
तसेच आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकारातून नाशिक भाभा नगर येथे सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाचे पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्णत्वास आलेले असून दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. आमदार देवयानी फरांदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय (टप्पा २) यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सचिव समितीच्या बैठकीत या कामाला देखील मान्यता देण्यात येऊन निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यातील धनगर समाजातील नागरिकांना व महिलांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने भरीव निधी मंजूर करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचे आमदार देवयानी फरांदे यांनी आभार व्यक्त केलेले आहेत.