छत्रपती संभाजी नगर/एनजीएन नेटवर्क
येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. संचालक मंडळासह 50 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकारामुळे संभाजीनगरमध्ये एक खळबळ उडाली आहे. संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे शेकडो सदस्य आहेत. यामुळे पतसंस्थेच्या सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या 200 कोटींचा घोटाळा प्रकरणी अध्यक्ष, संचालक मंडळासह सहा जणांविरुद्ध सिडको ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील एक घोटाळा 91 कोटींचा असून दुसरा गुन्हा 101 कोटींचा आहे. सहकार विभागाच्या लेखा परीक्षण अहवालात कर्जप्रकरणातील हा सगळं घोटाळा समोर आला आहे. मार्च 2019 अखेरीस आलेल्या कर्ज प्रकरणातील अपूर्ण स्थितीतले अर्ज पतसंस्थेने स्विकारले आहेत. कर्ज वाटपाचे निकषाचे जाणीवपुर्वक उल्लंघन करुन विनातारण आणि कमी तारण स्विकारुन गंभीर त्रुटी असलेले अर्जाचे आधारे कर्ज वितरीत केले असा ठपका ठेवण्यात आला आहे. वितरीत केलेल्या कर्जास संचालक मंडळ सभेने देखील गंभीर त्रुटीकडे जाणीवपुर्वक डोळेझाक करुन ठेवीदारांनी संस्थेत ठेवलेल्या ठेव रकमेतून मोठया प्रमाणात कर्जाचे वितरण करण्याच्या कृतीस मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता दोन वेगवेगळे गुन्हे सिडको पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.