धुळे/एनजीएन नेटवर्क
शहराच्या पारोळा रोड परिसरातील ‘पंजाबी सॉ मिल’ येथे पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी दरोडा टाकला आहे. दरोडेखोरांनी ‘पंजाबी सॉ मिल’चे मालक विनोद भसीन यांच्या डोक्याला बंदूक लावून आणि शस्त्रांचा धाक दाखवून हा दरोडा टाकत दहा लाख रुपयांची रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून विनोद भसीन यांच्या डोक्याला बंदूक लावली. तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवत मोठा दरोडा टाकला आहे. चोरट्यांनी भसीन यांच्याकडून तिजोरीच्या चाव्या घेत तिजोरीतील दहा लाख रुपयांची रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांपैकी चार जण अहिराणी भाषेत संवाद साधत होते. तर एकजण हिंदी भाषेत बोलत होता, अशी माहिती तक्रारदार विनोद भसीन यांनी दिली. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.