कोलंबो/एनजीएन नेटवर्क
भारताने आशिया कपच्या फायनल सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ आशियाचा नवा बादशाह झाला आहे. डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या 51 धावांचे आव्हान पार करताना टीम इंडियाने एकही गडी न गमावला सामना खिशात घातला. शुभमन गिल आणि इशान किशनच्या जोडीने काम फत्ते केलं. मात्र, विजयाचा खरा शिल्पकार ठरला मोहम्मद सिराज…
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याने श्रीलंकेविरुद्ध कहर केल्याचं दिसून आलं. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कॅप्टन दासुन शनाकाचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सपशेल फेल ठरवला. बुमराहने सामन्याच्या पहिल्याच बॉलवर कहर केला. सलामीवीर कुसल परेरा तंबुत धाडत बुमराहने नारळ फोडला. त्यानंतर सिराजने कहर केला. चौथ्या ओव्हरमध्ये सिराजने एक दोन नव्हे तर चार प्रमुख फलंदाज तंबुत धाडले. सलामीवीर पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका आणि धनंजय डी सिल्वा या चार खेळाडूंना घरचा रस्ता दाखवल्यानंतर टीम इंडियाचे काम सोप्पं झाले. रोहित शर्माने श्रीलंकेची वाईट अवस्था पाहून फिल्डिंग आणखी टाईट केली. एका बाजूने सिराजचा कहर सुरू होता. तर दुसऱ्या बाजूने रोहितने हार्दिकला बॉल सोपवला. हार्दिकने देखील कॅप्टनच्या विश्वासाला साथ देत 3 धावा देत 3 गडी टिपले. श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.