मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. बारामतीजवळ झालेल्या या अपघातावर त्यांचे पुतणे आ. रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. एरव्ही कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा अशी मागणी आ. पवारांनी केली.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. विमानाचे पायलट शेवटच्या क्षणी का बदलण्यात आले, ज्या सुमित कपूर यांच्याकडे विमानाची धुरा देण्यात आली, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड का तपासण्यात आला होता, त्यांची ब्रेथ ऍनलायझर टेस्ट झाली होती का, अशी पृच्छा त्यांनी केली. २७ जानेवारीला दादा मुंबईतून निघणार होते. त्यानुषंगाने संध्याकाळी त्यांच्या कारचा ताफा सज्जा होता. तथापि, त्याचवेळी पूर्व विदर्भातील एक बडा नेता त्यांच्या भेटीला गेला. त्याच्यासोबत बराच वेळ चर्चा झाल्यानंतर दादांना बराच उशीर झाला. म्हणूनच त्यांनी कारने जाण्याचा निर्णय रद्द केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळचे विमान बुक करण्यात आल्याचे आ. पवार म्हणाले.
अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्त्रायलची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला. अशी कामं करण्यामध्ये इस्त्रायलचा एक एजंट कुशल होता. एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचे असल्यास त्याच्या ड्रायव्हरला संपवा असे तो म्हणायचा. अजितदादांच्या अपघातासंबंधी असाच काही प्रकार घडलाय का, याचा तपास व्हावा, अशी मागणी आ. पवारांनी केली.
रोख नरेश अरोरा यांच्याकडे?
‘एका राजकीय सल्लागाराचे कंत्राट रद्द करायचे आहे, असे अजित पवार म्हणत होते. तुम्ही सर्व्हे करा, आम्हाला राजकारण कसे करायचे ते शिकवू नका, असे अजितदादा यांनी त्यांना सुनावले होते, असा दावा रोहित पवारांनी केला. रोहित पवारांचा रोख नरेश अरोरा यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स कंपनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करते.
काचेच्या बाटलीतून पाणी प्यायचे..
गेल्या काही दिवसात दादांनी प्लॅस्टिक बाटली वापरणे बंद केले होते. त्यांनी काचेच्या बाटलीतून पाणी प्यायला सुरूवात केली आणि ती बाटली नेहमी त्यांच्या विश्वासू सुरक्षारक्षकाच्या हाती असायची असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी असे का केले, त्यांना काही कुणकुण लागली होती का? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला.
Comments are closed.