
- निमा शिष्टमंडळास आश्वासन; औद्योगिक माल वाहतूकीत अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारून ते दर्जेदार करण्यात येतील. तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) चे आयुक्त जलज शर्मा यांनी निमा अध्यक्ष आशिष नहार यांच्यासह नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या शिष्टमंडळाला दिले.
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील जोडरस्त्यांची सुधारणा आणि बळकटीकरण करण्याची नितांत गरज असल्याचे निवेदन निमा तर्फे अध्यक्ष आशिष नहार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एनएमआरडीएचे आयुक्त जलज शर्मा यांना दिले. त्यावेळी ते बोलत होते.
शिंदे-पळसे, सिन्नर औद्योगिक क्षेत्र, ब्राम्हणवाडे औद्योगिक क्षेत्र, सिन्नर ते नायगाव, गोंदे औद्योगिक क्षेत्र, भांगरे चौक (ओझर विमानतळ रस्ता) – आंबे दिंडोरी – जानोरी, जानोरी – गाववाडी – आक्रळे, तळेगाव – दिंडोरी, खतवड रस्ता – पिंपळनारे शिवार रस्ता, वाडीवऱ्हे जवळके डीआरडीओ ते बाफना वेअरहाऊस, तसेच जवळके डीआरडीओ ते जवळके या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे औद्योगिक मालाची वाहतूक करताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व रस्त्यांची त्वरित संयुक्त पाहणी (निरीक्षण) करण्यात यावी. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे तातडीने दुरुस्ती तसेच रस्त्यांचे रिसर्फेसिंग करण्यात यावे. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी ड्रेनेज सिस्टीमची सुधारणा करण्यात यावी. तसेच रस्त्यांवर योग्य मार्किंग, दिशादर्शक फलक आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात. अधिक रहदारी असलेल्या रस्त्यांसाठी दीर्घकालीन बळकटीकरण आणि रुंदीकरणाच्या योजनांचाही विचार करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आवश्यकतेनुसार संयुक्त पाहणी किंवा चर्चेसाठी सहकार्य आणि समन्वय साधण्यास निमा पदाधिकारी तत्पर असल्याचेही नमूद करण्यात आले. सुधारित रस्ते पायाभूत सुविधांमुळे औद्योगिक कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि नाशिकच्या एकूण आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या शिष्टमंडळात निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, अमित बाफना यांचाही समावेश होता.

Comments are closed.