नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
दररोज १५ ते २० मिनिटे फक्त १.५ ते २ किमी चालल्यास किंवा दिवसातून चार हजार पावले चालल्यास, कोणत्याही आजारामुळे होणारा मृत्यू होण्याचा धोका कमी होऊ शकतो, असा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे. शिफारस केलेल्या प्रमाणाच्या अर्ध्यापेक्षा थोडे जास्त चालल्यास, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांमुळे होणारा मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो, असेही निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे.
पोलंडमधील लॉड्झ मेडिकल युनिव्हर्सिटीमधील कार्डिओलॉजीचे प्रोफेसर मॅसीज बानाच यांनी केलेले हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे. या संशोधनासाठी त्यांनी दोन लाख २६ हजार ८८० लोकांची माहिती गोळा केली. संशोधनात ज्यांनी सरासरी सात वर्षे वेगवेगळ्या दैनंदिन स्टेप काउंट ( रोज किती पावले चालले यांची संख्या) संख्या पूर्ण केले अशा लोकांची माहिती होती. मिळालेल्या माहितीनुसार, रोज ठराविक पावले चालल्यास आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन प्रोफेसर बानाज यांनी केले.