मुंबई/एनजीएन नेटवर्क
एखाद्या भिकाऱ्याची 8 कोटींची संपत्ती असणे हे केवळ काल्पनिक असू शकते. मात्र देशाच्या आर्थिक राजधानीने हे सत्य प्रत्यक्षात उतरवले आहे. तुम्ही भिकाऱ्यांना कधी तरी एक-दोन रुपये फार फार तर दहा रुपये दिले असतील. पण अशी भीक मागून एखादा भिकारी कोट्यवधी रुपये कमवू शकतो, याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? अशीच भीक मागून थोडथोडके नव्हे तर तब्बल 8 कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला भिकारी आहे तो मुंबईत. आश्चर्य म्हणजे इतकी संपत्ती असूनही अजूनही तो रस्त्यावर भीक मागतो आहे.
जगात असे अनेक लोक आहेत जे 400-500 रुपयांसाठी दिवसभर कष्ट करतात. पण एक भिकारी जो कोणतंही काम न करता दररोज 2000-2500 रुपये कमवतो आहे. भरत जैन असे या भिकाऱ्याचे नाव आहे. जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून तो ओळखला जातो. भरतची एकूण संपत्ती 7.5 कोटी आहे. त्याचा मुंबईत 2 बेडरूमचा फ्लॅट आहे, ज्याची किंमत 1.2 कोटी रुपये आहे. ठाण्यात त्याची 2 दुकाने आहेत. जी दरमहा 30 हजार रुपये भाड्याने चालतात. त्यामुळे त्यांचं मासिक उत्पन्न 60 हजारांवरून 75 हजार रुपयांपर्यंत वाढते. एखाद्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्याकडेही एवढी संपत्ती नाही.
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, भरतचं औपचारिक शिक्षण झालं नव्हतं. त्याने भीक मागून जीवन जगण्यास सुरुवात केली. जैन स्वतः शिकला नाही पण त्याची मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकली आहेत. पत्नी दोन मुलं, भाऊ आणि वडिलांसह भरत परेलमध्ये 1 बीएचके डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहतो. त्याच्या घरची परिस्थितीही चांगली आहे. पण तरी तो अजून रस्त्यावर भीक मागतो. भरतच्या कुटुंबानं त्याला अनेक वेळा भीक मागण्यापासून रोखलं, कारण आता त्याच्याकडे पैसा आहे, तो चांगलं जीवन जगू शकतो. पण तरी तो कुणाचंच ऐकला नाही. आजही तो रस्त्यावर भीक मागून पैसे कमावतो.