नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
महागाईच्या आघाडीवर देशासाठी एक चांगली बातमी आहे. जुलैमध्ये घाऊक महागाईचा दर उणे १.३६ टक्क्यांवर राहिला आहे. हा सलग चौथा महिना आहे, जेव्हा घाऊक महागाई दर नकारात्मक राहिला आहे. घाऊक महागाई दर कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे इंधनाच्या किमतीत झालेली घट आहे. मात्र, या काळात खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. घाऊक महागाई एप्रिलपासून नकारात्मक राहिली असून, जूनमध्ये ती उणे ४. १२ टक्क्यांवर आली आहे.
जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत १४.२५ टक्के वाढ झाली आहे, जी जूनमध्ये केवळ १.३२ टक्के होती. इंधन आणि ऊर्जा बास्केटमधील महागाई १२.७९ टक्क्यांवर आहे. उत्पादनांवरील घाऊक महागाई जूनमध्ये उणे २.७१ टक्क्यांच्या तुलनेत जुलैमध्ये उणे २.५१ टक्के होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कापड आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई दरात घट झाली आहे.