पुणे/एनजीएन नेटवर्क
जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात आयआयटी हैद्राबाद विभागातील वाविलाला चिद्विलास रेड्डी या विद्यार्थ्याने ३६० पैकी ३४१ गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला. तर नायाकांती नागा भाव्या श्री या विद्यार्थिनीने ३६० पैकी १९८ गुण मिळवत मुलींमध्ये पहिले स्थान प्राप्त केले.
देशातील आयआयटींमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. आयआयटींमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस असते. त्यामुळे जेईई मेन्स या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचे लक्ष जेईई अॅडव्हान्स्डकडे असते. यंदा आयआयटी गुवाहाटीतर्फे जेईई अॅडव्हान्स्ड आयोजित करण्यात आली. जेईई अॅडव्हान्स्डसाठी १ लाख ८० हजार २७२ परीक्षार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्समधील दोन्ही पेपर दिले. त्यातील ४३ हजार ७७३ परीक्षार्थी पात्र ठरले. त्यात ७ हजार ५०९ मुली आहेत. आयआयटी मुंबईअंतर्गत ७ हजार ९७५, आयआयटी दिल्लीअंतर्गत ९ हजार २९०, आयआयटी गुवाहाटीअंतर्गत २ हजार ३९५, आयआयटी हैद्राबाद अंतर्गत १० हजार ४३२, आयआयटी कानपूरअंतर्गत ४ हजार ५८२, आयआयटी खरगपूरअंतर्गत ४ हजार ६१८, आयआयटी रुरकीअंतर्गत ४ हजार ९९९ परीक्षार्थी पात्र ठरले. आयआयटी मुंबई विभागातील अनुक्रमे पहिल्या पाच स्थानी शंकर, युवराज गुप्ता, चैतन्य माहेश्वरी, जस्त्य जरीवाला, सुमेध एस एस यांचा समावेश आहे, तर मुलींमध्ये आदिती सिंगने पहिला क्रमांक मिळवला.