नाशिक/एनजीएन नेटवर्क
शहरातील इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या गजरा उद्योग समूहाचे अध्यक्ष हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. या घटनेने शहरभर खळबळ माजली असताना पारख हे रविवारी सकाळी सुखरूप घरी पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली. पारख यांच्या अपहरण प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
प्राप्त माहितीनुसार, बांधकाम साहित्य वितरणाचा व्यवसाय करत असलेले हेमंत पारख हे शनिवारी रात्रीच्या सुमारास आपल्या निवासस्थानाबाहेर उभे असताना अपहरणकर्त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत त्यांना मोटारगाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. यासाठी नंबरप्लेट नसलेल्या दोन मोटारगाड्यांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पारख यांच्या अपहरणामागे जागेचा वाद असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती.
दरम्यान, शहरातील नामांकित समूहाच्या अध्यक्षाचे अपहरण झाल्याने शहरभर खळबळ माजली होती. व्यावसायिक विश्वात तो चर्चेचा विषय बनला असतानाच रविवारी सकाळी सुखरूप घरी पोहोचले. त्यांच्या घरवापसीने त्यांच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला. शिवाय, पोलीस खात्यानेही सुटकेचा नि:श्वास टाकला. तथापि, पारख यांचे अपहरण नेमके कोणी आणि कोणत्या कारणासाठी केले होते, या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळत नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. जोपर्यंत स्वतः पारख अथवा पोलीस खुलास करत नाही, तोवर हे प्रश्न अनुत्तरीतच राहणार असल्याचे दिसत आहे.