पुणे/एनजीएन नेटवर्क
महाराष्ट्राला पडलेले एक सुरेख निसर्गस्वप्न अशी ज्यांची ओळख करून दिली जाते अशा ज्येष्ठ कवी, साहित्यिक ना. धों. महानोर यांनी जगाचा निरोप घेतला. महानोर यांचे आज सकाळी निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते.
आपल्या तरल काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात ना. धों. महानोर यांनी हक्काचे स्थान प्राप्त केले होते. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ते सातत्याने आजारी होते. तर हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना 20 दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर आज त्यांनी प्राण सोडले.
ना धों महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी इथे झालं. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले. मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. ना.धों. महानोर यांनी ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली.