मुंबई/एनजीएन नेटवर्क
ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या एन.डी. स्टुडिओमध्येच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी यावेळी मानवंदना दिली. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांबरोबरच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाच्या सेटवर नितीन देसाईंनी आत्महत्या केली होती. त्यांनी एक चिठ्ठी लिहित आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती. ‘माझा अंत्यविधी सहा नंबरचा ग्राऊंड आहे, तिथे हॅलिपॅड आहे, त्या ठिकाणी व्हावा, असे त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवले होते. ‘जोधा अकबर’ सिनेमाच्या सेटवर नितीन देसाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
मधुर भांडारकर, रवी जाधव, शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी देसाईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच राज्यसभा खा. उदयनराजे भोसले आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी देखील एन.डी.स्टुडिओमध्ये अंत्यदर्शन घेतले. मराठी सिने सृष्टीतील सुबोध भावे, मानसी नाईक, निखिल सानेदेखील आले अंत्यदर्शनासाठी आले होते. नितीन देसाई यांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि बहीण आहे. नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देताना सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीदेखील भावूक झाले.