मुंबई/एनजीएन नेटवर्क
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत राज्यामधील सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने कपात केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. आतापर्यंत ठाकरे कुटुंबियांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली जात होती. मात्र आता त्यांना व्हाय दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे. याशिवाय मुंबईतील कलानगर येथे ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ येथील सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मातोश्री’वरील एसआरपीएफची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडीही कमी करण्यात आली आहे, तसेच एक पायलट वाहनही कमी करण्यात आले आहे.
अचानक गृह खात्याकडून उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साधारणपणे 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत गुंतले होते. मात्र, आता या सर्वांनाच कमी करून पुन्हा पोलीस ठाण्ंयामध्ये रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी केली कमी केली असून पायलटही कमी करण्यात आला आहे. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षादेखील काढून टाकण्यात आली.