NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘निमा’च्या माध्यमातून दिंडोरीत उद्योगांसाठी रेडकार्पेट – नितीन गवळी

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

एमआयडीसीतर्फे दिंडोरी तालुक्यात आत्ता झालेल्या भूसंपादनाच्या व्यतिरिक्त निमाच्या व अनेक उद्योजकांच्या मागणीवरून येणाऱ्या काळात उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात जागा संपादित करण्यात येणार असून त्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जांबुटके येथे आदिवासी भागातील उद्योजकांना व लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी विशेष एमआयडीसी होउ घातली आहे.अकराळे येथे एमआयडीसी मार्फत लवकरात लवकर निमाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यास उद्योग मंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, असे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले.

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या दिंडोरी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे गवळी बोलत होते.व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, डीजी जोशी, अण्णासाहेब देशमुख, रमेश वैश्य, मनिष कोठारी, दिंडोरीचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उद्योजक आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत बनकर, दिंडोरी कार्यालय उपससमितीचे चेअरमन
नितीन वागस्कर, को चेअरमन योगेश पाटील, सदस्य माधवराव साळुंखे,एचएएलचे वरिष्ठ अधिकारी जावेद अली, उमेश कोठावदे,आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे,वरूण तलवार,निमा कार्यालयासाठी तळेगाव येथे जागा उपलब्ध करून देणारे योगेश पाटील, विवेक पाटील आदी होते.

उद्योजकांनी स्थानिक लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.त्यांना मदत करावी.सीएसआरबद्दल त्यांच्या मनात असलेले समज-गैरसमज दूर करावेत,असे आवाहनही गवळी यांनी केले. निमाच्या दिंडोरी कार्यालयामुळे दिंडोरी तालुक्यातील सर्वच उद्योजकांना त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याचेही गवळी यांनी नमूद केले. व ही काळाची गरज ओळखून निमाने उचललेल्या या पुढाकाराचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.


झुंडशाहीचा संघटितपणे मुकाबला करू : बेळे

औद्योगिक विकासासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करून जिल्ह्याची आगळी ओळख निर्माण करूया.औद्योगिक क्षेत्रात नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्याही औद्योगिक क्षेत्रामध्ये कुणाचीही झुंडशाही, दादागिरी, खंडणीखोरी व दबंगगिरी खपवून घेतली जाणार नाही. त्याचा संघटितपणे मुकाबला केला जाईल,असा उद्गार वजा इशारा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आपल्या भाषणात दिला. औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जागा आरक्षित करण्यात येत असल्याने येथे मोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना चांगली संधी असून दिंडोरी तालुक्यात मोठे प्रकल्प होऊ घातले आहेत ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने निश्चितच भूषणावरअसल्याचेही बेळे यांनी स्पष्ट केले. यामुळेच नियमाने दिंडोरी तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून येणाऱ्या गुंतवणुकी करता दिंडोरीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.


दिंडोरी कार्यालय म्हणजे निमाच्या वाटचालीचा महत्वाचा टप्पा आहे.जेथे औद्योगिक वसाहती आहेत तेथे निमाने संपर्क कार्यालय सुरू करावीत, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे यांनी सांगितले. व निमा अध्यक्ष धनंजय बेळे व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले,विधान परिषदेसाठी पदवीधर, शिक्षकांप्रमाणेच उद्योजकांचा ही मतदारसंघही हवा, अशी सूचनाही त्यांनी केली.

दिंडोरी तालुक्यात उद्योजकांना सुव्यवस्थेबाबत त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगून एमआयडीसी परिसराच्या बंदोबस्तासाठी निमाने एखादे वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दिंडोरीचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी केली. दिंडोरी तालुक्यात एमआयडीसीने जास्तीत जास्त जागा संपादित करावी. निमाचे कार्यालय म्हणजे दिंडोरीच्या उद्योजकांच्यादृष्टीने एक प्रकारे कवचच ठरेलं,असा विश्वास उद्योजक उमेश कोठावदे यांनी व्यक्त केला. उद्योजकांना स्थानिक लोकांकडून विशेष सहकार्य लाभत आहे परंतु काही थोड्या प्रमाणात विघातक शक्तींचा त्रास होत असून त्याचा बंदोबस्त करण्यास निमाचा निश्चितच उपयोग होईल,असे उद्योजक आणि माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी चंद्रकांत बनकर यांनी सांगितले. यावेळी अकराळे ग्रामपंचायतचे सरपंच आणि तळेगावच्या ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच निमाच्या च्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणारे विवेक पाटील आणि योगेश पाटील यांचाही यावेळी सत्कार झाला.

कार्यक्रमास निमाचे खजिनदार विरल ठक्कर,निमा हाऊस कमिटी चेअरमन राजेंद्र वडनेरे, गोविंद झा,संजय सोनवणे,सतीश कोठारी,मनीष रावल,संदीप भदाणे,किरण वाजे, सुरेंद्र मिश्रा,प्रवीण वाबळे,सुधीर बडगुजर,सचिन कंकरेज,नीलेश पटेल,किरण खाबिया, विश्वजीत निकम, किरण लोणे,मिलिंद इंगळे, रवी पुंडे,श्रीकांत पाटील,यश राठी, अखिल राठी, शशांक मनेरिकर,रवींद्र झोपे, संदीप जगताप,किरण शिंदे यांच्यासह नाशिक, सिन्नर, दिंडोरीतसेच जिल्ह्यातील 250/300 हुन अधिक संख्येने उद्योजक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.