मुंबई/एनजीएन नेटवर्क
अजित पवारांसह ९ मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो, अशी माहिती भेटीनंतर खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तथापि, सर्वांनी झालेल्या घटनेबद्दल दिलगीरी व्यक्त करून यातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या भेटीनंतर प्रसार माध्यमांना दिली.
पाटील म्हणाले, अचानकपणे ते येऊन भेटले आहेत. कोणाचा काय उद्देश होता, यावर आज सांगणं अवघड आहे. पण, सर्वांनी दिलगीरी आणि खंत व्यक्त केली आहे. तसेच, सर्वांनी एकत्र यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आमची फारशी चर्चांही झाली नाही.
पवारांना मंत्र्यांसह प्रमुख नेते भेटले
तत्पूर्वी, बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. त्यावर खुलासा करताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. आम्ही वेळ न मागता भेटीसाठी आलो. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहण्यासाठी विचार करावा. तसेच, आम्हाला मार्गदर्शन करावे, ही विनंती शरद पवारांना केली आहे. शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे आमचे विचार आणि मत ऐकून घेतली. उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन सुरु होते. सर्व मंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात आपल्या विभागाची जबाबदारी विधानसभेत पार पाडतील