नवी दिल्ली /एनजीएन नेटवर्क
येत्या २०३० वर्षांपर्यंत भारतीय मालमत्ता बाजार १ ट्रिलियन डॉलर्स एवढा वाढेल, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे येत्या काही वर्षांत देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रॉपर्टी मार्केटमध्ये प्रचंड तेजी येणार असून, रोजगार वाढणार आहेत.
CNBC-TV18 च्या अहवालानुसार, २०२१ मध्ये भारतीय मालमत्ता बाजार २०० अब्ज डॉलरचा होता, परंतु २०३० पर्यंत तो १ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढू शकतो. विशेष म्हणजे काळानुरूप केवळ प्रॉपर्टी मार्केटच वाढणार नाही, तर देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याची भूमिकाही वाढणार आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच दरवर्षी लाखो लोक रोजगाराच्या शोधात शहरांकडे जात आहेत. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला राहण्यासाठी घराचीही गरज भासणार आहे. त्यामुळे प्रॉपर्टी मार्केटमध्ये तेजी येणार आहे. विशेषत: मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये मालमत्ता व्यवसाय वेगाने वाढेल. लोकांना राहण्यासाठी उंच इमारती बांधाव्या लागतील.