त्र्यंबकेश्वर/रवींद्र धारणे
रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी तर सुप्रसिद्ध बॉलीवूड चित्रतारका तथा शिवभक्त सिनेतारका कंगना राणावत यांनी गुरुवारी सहकुटुंब त्र्यंबकराजाचे मनोभावे दर्शन घेतले.
दास यांनी आज सहकुटुंब सहपरिवार भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन रुद्राभिषेक केला. त्यांचे समवेत त्यांच्या पत्नि लोपमुद्रा दास, आशिष नारायण, अन्वेषा दास, वीर नारायण आदी कुटुंबियासह प्रोटोकाॅल अधिकारी सुनिल रामचंद्रन आदी मान्यवर होते. देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, स्वप्निल शेलार, मनोज थेटे, रुपाली भुतडा आदींनी त्यांचे स्वागत केले. सोवळे नेसुन त्यांनी गर्भगृहात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. रुद्राभिषेक पुजा करुन आरती केली. पुजेचे पौरोहित्य पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी विश्वस्त वेदमुर्ती प्रशांत गायधनी यांनी केले. यावेळी वेदमुर्ती हरीश गायधनी, मनोज थेटे, श्रीपाद अकोलकर आदी ब्रह्मवृंद उपस्थित होते. दर्शनसोहळा पार पडल्यावर देवस्थान कोठी सभागृहात देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला
कंगना कडून धार्मिक विधी नाही
कंगना राणावत यांनी गुरुवारी सहकुटुंब त्र्यंबकराजाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अभिषेक, पूजा, आरती कोणताही धार्मिक विधी केला नाही. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कोठी हॉल कार्यालयात त्यांचे स्वागत झाले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नगर परिषद प्रशासक तथा देवस्थानच्या सचिव डॉ. श्रिया देवचके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विश्वस्त डॉ. देवचके, पुरुषोत्तम कडलग, कैलास घुले, स्वप्निल शेलार आदी उपस्थित होते. यावेळी ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराची माहिती त्यांना देण्यात आली.