पुणे : महाराष्ट्रातील ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजची राज्यस्तरीय शिखर संस्था असलेल्या फेम (फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग एंटरप्रेनियर्स) ची जनरल बॉडी मिटिंग दि.१४ जून रोजी पुणे येथे संपन्न झाली. यावेळी फेडरेशन अध्यक्षपदी नाशिकच्या गुरु पब्लिसिटीचे संचालक रवी पवार यांची निवड करण्यात आली .
यावेळी पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, कोकण, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आदी जिल्ह्यांतील जाहिरात एजन्सिजचे प्रतिनिधी तसेच जिल्हा संघटनेचे सदस्य उपस्थित होते. हे शीर्षक असलेल्या या बैठकीमध्ये सकाळ समूहाचे श्री उदय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी दुसऱ्यांमध्ये बदल करण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे मन सकारात्मक असले पाहिजे, व्यवसायात नाविन्यता असली पाहिजे, आपल्याकडे असलेल्या माहितीचा योग्य उपयोग करता आला पाहिजे. व्यवस्थापन व कार्यपद्धती यावर भर दिला पाहिजे या विषयांवर सर्वांना माहिती दिली व त्यावरील प्रश्नांचे समाधान केले.त्यानंतर सौ. ऊर्जा पाटील यांचे मानसिक स्वास्थ्य या विषयावर अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन झाले. त्यांनी यात स्वतःला स्वतः मध्ये कसे शोधायचे आणि आपले मानसिक स्वास्थ्य व शांत कसे ठेवावे याबद्दल त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले.
सेतू मीडिया चे श्री. ऋग्वेद देशपांडे यांनी जाहिरात व्यवसाय व त्यातील इतर संधी या विषयी विविध उदाहरण देऊन या व्यवसायातील शंकांचे निरासरण केले.
साम टीव्ही चे संपादक श्री नीलेश खरे यांनी टीव्ही माध्यमातील जाहिरात व्यवसायाचे संधी या विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी ‘फेम’च्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. फेमचे संस्थापक अध्यक्ष अमरदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी अध्यक्ष मोतीराम पिंगळे व मावळते अध्यक्ष महेश कराडकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सन २०२५-२७ या कालावधीसाठी अध्यक्षपदी रवी पवार (नाशिक), उपाध्यक्ष प्रकाशभाई शहा (पुणे), सचिव रामदेव व्यास (छत्रपती संभाजीनगर), सहसचिव अजिंक्य उजळंबकर (छत्रपती संभाजीनगर), खजानीस कौस्तुभ नाबर, (कोल्हापूर) तसेच पुढील २०२७-२९ या कालावधीसाठी अध्यक्ष (इलेक्ट) म्हणून संदीप झवेरी (सोलापूर) यांची यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय साताळकर (पुणे), सुनील बासरानी (कोल्हापूर), दीपक जगताप (नाशिक), संतोष उदगिरी (सावा), राहुल देशपांडे (सातारा), नरेंद्र चौधरी (जळगाव), अरुण मलिक (छत्रपती संभाजीनगर), राजेंद्र म्याना (अहिल्यानगर), सुनील बुधवानी (नागपूर), राजेश वाळवेकर (बेळगाव), परेश पेडणेकर (कोकण) यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या सुरवातीला मावळते अध्यक्ष महेश कराडकर यांनी त्यांचा कार्य अहवाल मांडला. कौस्तुभ नाबर यांनी मागील सभेचे इतिवृत्त व आर्थिक अहवाल सादर केला त्यास मंजुरी देण्यात आली.
सेमिनार, प्रशिक्षण शिबिरे घेणार : पवार
नूतन अध्यक्ष रवी पवार यांनी जाहिरात एजन्सीच्या उन्नतीसाठी येणाऱ्या काळात विविध सेमिनार तसेच प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अद्याप ज्या जिल्ह्यांमध्ये जाहिरात एजन्सिजच्या जिल्हा संघटना कार्यरत नाहीत तेथे जिल्हा संघटना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे पवार म्हणाले. जाहिरात एजन्सी समोरील विविध समस्या व आव्हानांची यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. संदीप झवेरी यांनी सूत्रसंचालन केले. सचिव रामदेव व्यास यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार मानले. यावेळी राज्यातील सर्व एजन्सीजचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.