नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
टोमाटो आणि कांदा दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या भावना संतापजनक असताना आता त्यामध्ये डाळींचे दर वाढण्याच्या वृत्ताने भर पडणार आहे. डाळींमध्ये असणारी गेल्या वर्षीची तूट यावर्षी अजूनही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळीची भाववाढ निश्चित आहे. गेल्या वर्षी ५ लाख टन तूर डाळीची तूट होती. यावर्षी ४ लाखांची तूट असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आता भाववाढीवर होऊ शकतो.
सलग दुस-या वर्षी डाळींची स्थिती बिकट झाली आहे. पेरणीचा पारंपरिक हंगाम १५ जून ते १५ जुलै संपल्यानंतर ही जुलैअखेरपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. मात्र, असे असताना सध्या देशभरात सर्व प्रकारच्या डाळींच्या पेरण्यांत ९ टक्क्यांची तूट आहे. यामुळेच प्रामुख्याने तूरडाळीची ५ लाख टनांची तूट असताना त्यात ४ लाख टनांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही स्थिती समोर आली आहे. देशभरातील पेरणी क्षेत्रात झालेली ९ टक्के घट, तुरीची तूट ७ टक्क्यांवर आणि तुटीत आणखी 4 लाख टनांची भर आदी दरवाढीमागील कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतात दरवर्षी सर्व प्रकारच्या डाळींचे उत्पादन १२० ते १२२ लाख टनांच्या आसपास असते. त्या तुलनेत मागणी १२६ ते १२८ लाख टन असते. उडीद व मूग वगळता उर्वरित डाळींसाठीचे पीक हे फक्त खरिपात घेतले जाते. या डाळी दिवाळीनंतर बाजारात येतात. डाळींच्या एकूण मागणीत सर्वाधिक ४२ ते ४४ लाख टन तूरडाळीचा समावेश असतो. या तुलनेत उत्पादनदेखील जवळपास तितकेच असते.
सरकारकडून आयात धोरण…
येत्या काळात डाळीचे भाव वाढत जाणार असल्याने सरकार आता आयात धोरण स्वीकारत आहे. मात्र, जागतिक बाजारातही उत्पादन कमी झाल्याने भाववाढीवर किती नियंत्रण मिळेल, ते सध्या सांगता येत नाही. पण बदललेले पाऊसमान, पीक पद्धती, याचा थेट परिणाम तुरडाळीच्या उत्पन्नावर होत आहे.