- संभाजीनगर महामार्ग रोखला; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
** मच्छिंद्र साळुंके
विंचूर : एनजीएन न्यूज नेटवर्क
कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून, त्यांच्या संतापाचा उद्रेक आज विंचूर येथे झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संभाजीनगर महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याला केवळ ७ ते १० रुपये प्रतिकिलो एवढेच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्च, वाहतूक व मजुरी यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. या परिस्थितीविरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी महामार्गावर उतरले.
यावेळी शेतकऱ्यांनी “कांद्याला हमीभाव द्या”, “शेतकरी विरोधी धोरणे बंद करा”, “शेतकऱ्यांच्या घामाचे मोल द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी यांनी केले.
प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली. काही वेळानंतर पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु, शेतकऱ्यांनी इशारा दिला की जर कांद्याच्या दरात सुधारणा झाली नाही आणि सरकारने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
—–
@ स्थानिक प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले असून, पुढील काही दिवसांत या विषयावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
Comments are closed.