नाशिक/एनजीएन नेटवर्क
स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिकची घसरण झाली आहे. देशात नाशिक थेट 21 व्या स्थानी फेकले गेले आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. 2026 पर्यंत वायू प्रदूषण 40 टक्यांपर्यंत कमी करण्यासाठी ‘एन कॅप’ कार्यक्रमांतर्गत शहर-विशिष्ट कृती योजनांच्या अंमलबजावणीसाठी एकूण 131 शहरांची निवड करण्यात आली होती. या शहरांच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे आयोजित स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत नाशिकला चिंताजनक मानांकन प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम साहित्य विल्हेहाट व्यवस्था, रस्त्यावर उडणारी धूळ, ग्रीनरी आणि एनकॅप योजने अंतर्गत वायू प्रदूषण घटवण्यासाठी दिलेला निधीचा वापर हे प्रमुख निकष होते. त्यासाठी दोनशे गुण देण्यात आले होते. यामध्ये नाशिकला 160 गुण मिळाले. तर एअर क्वालिटी इंडेक्समध्ये 61 गुण मिळाले. सर्वाधिक फटका एन कॅप योजनेअंतर्गत प्राप्त निधी खर्च करण्यात महापालिका अपयशी ठरल्याचा आहे. मागील चार वर्षात या योजनेअंतर्गत प्रदूषण कमी करण्यासाठी ऐंशी कोटींचा निधी मिळाला असून जेमतेम वीस कोटी निधीही महापालिकेला खर्च करता आला नाही.