** एनजीएन नेटवर्क
उन्हाळ्याचा दाह कमी करणारा पावसाळा जेव्हा नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरात स्थिरावतो तेव्हा क्षणात मन मोहरून पुन्हा नव्याने ताजेतवाने होवून जाते.नाशिक आणि आजूबाजूचा परिसर, सगळेच सुंदर.
नाशिकच्या आजूबाजूचा परिसर खरच खुपच देखणा आहे.अगदी पावलापावलावर कोसळणारे असंख्य धबधबे,निसर्गरम्य वातावरण,दाट हिरवाई आणि धुके. मन कवितामय नाही झाले तरच नवल. प्रत्येकालाच गुणगणाव वाटेल असेच वातावरण चोहीकडे असते.
आळंदी,गंगापूर,आंबोली,वैतरणा,काश्यपी, भंडारदरा, चोहीकडे भरलेली धरणे बघून मन आनंदून जाते. सगळीकडे आल्हाददायक वातावरण. नाशिकचा पावसाळा सुंदरच. जगाच्या पाठीवर कुठे ही नसेल अशी सुंदरता नाशिकला लाभली आहे.
नाशिकचा पाऊस हा मुंबईसारखा धो धो पडत नाही हळूहळू रिमझिम बरसत असतो.आणि मग हातात चहाचा कप घेवून खिडकीत गझल ऐकत बसण्याचा आनंद काही अवर्णनीयच.
अगदी वर्षातून एकदाच प्रथमच आपण आपल्या मनाला भेटल्यासारखे भेटतो. मनाच्या कप्प्यात खोलात दडलेले सर्व काही हळूहळू बाहेर डोकवायला लागते.कधी ओठावर खुदकन हसू आणणारे क्षण आठवतात तर कधी हलकेच नकळत गालावर अश्रू ओघळणारे तर कधी कपातला चहा संपूनही जातो पण मन विचारामध्ये मग्न झालेले.सगळेच सुंदर.वेगळे आणि छान.
पावसाळ्यातील फोटोग्राफी तर भन्नाटच असते.प्रत्येकालाच आपण म्हणजे उत्तम फोटोग्राफर असल्याचे प्रमाणपत्र देणारे असंख्य क्षण. सतत कॅमेराची आणि मोबाइलची लेन्स ३६० डिग्री मध्ये फिरत असते आणि मग आपणच काढलेल्या फोटोकडे तासन् तास बघत बसणे आणि समाधानाचे हसू चेह-यावर येणे केवळ सुंदर अनुभूती.
नाशिक मुंबई कारचा रस्ता वेड लावणारे सौंदर्य …..मनाला मोहवून टाकणारा….एका बाजूला उंचच उंच डोंगरकडे,तर दुस-या बाजूला काळजाचा ठाव घेणा-या खोल द-या आणि कड्याकपारीतून वाहणारे असंख्य सुंदर धबधब्यांची मालिका.डोंगर,द-या आणि असंख्य धबधबे अगदी हाकेच्या अंतरावर.
ढगांनी झाकलेले डोंगरमाथे.हळूच डोकावणारी विवीध रानफुले.आणि सुसाट वेगाने वाहणारे खळाळते पाणी.वाटेत असंख्य धबधब्यांची मालिकाच बघता येते.निसर्गाचा मनमुराद आनंद घेत प्रवास करणे ह्या सारखे दुसरे सुख नाही.
नाशिक मुंबई रस्त्यावरील नागमोडी वळणं, कसारा घाट,प्रचंड धुकं हे सगळे फक्त पावसाळ्यातच अनुभवायला मिळते. पावसाळ्यातील नाशिकचा निसर्ग म्हणजे केवळ अहाहा….!!!!!
नकळत आठवत जाणारे गुलजार तर कधी हरीहरन ची एखादी मनाच्या कोप-यात दडलेली गझल हळूच ओठावर स्वार होते.आणि मग काय सगळाच प्रवास नादमय होतो.पावसात चिंब भिजाव आणि आंतरबाह्य ओलंचिंब होवून जावे ह्या सारखे दुसरे सुख नाही.कधी कल्पनाविश्वात तर कधी आठवणीत आपण सहज शिराव.
जिवनाचे कितीतरी पैलू आपण क्षणात निसर्गाकडून अनुभवतो.सुंदर रमणीय निसर्ग तेवढाच कधीतरी भयावह ही वाटतो.अगदी दोन फुटावरचा माणूस ही दिसणार नाही इतके प्रचंड धुके आणि प्रचंड कोसळणारा पाऊस आनंदासोबत कधीतरी भयावह ही वाटतो.
हवाहवासा वाटणारा गारवा आणि नाशिकचा पाऊस सगळेच सुंदर..केवळ स्वर्गीय अनुभूती…..।.!!!
मी मनापासून सांगते नाशिकच्या पावसाची तुलना जगात कुठेही पडणा-या पावसासोबत होवू शकत नाही.
- अपर्णा मारावार