मनमाड/विशेष प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे मनमाड शहर आणि परिसरात रिमझीम स्वरूपात पाऊस होत असून या मुळे शहरातील नागरिकांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
पावसाळा ऋतू सुरू होऊन देखील गेल्या काही दिवसांपासुन दडी मारून बसलेल्या पावसाने गोकूळ अष्टमीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा राज्यासह अनेक शहरांमध्ये दमदार पुनरागमन केले असुन , यामुळे पावसाची प्रतिक्षा करत असणारा शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस होत नसल्याने शेतातील अनेक पीके पाण्याअभावी जळाली असुन अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. कालपासून सुरू झालेला पाऊस राज्यातील अनेक ठिकाणी दमदार बरसत आहे.
मनमाड शहर आणि परिसरात देखील रिमझीम स्वरूपात पाऊस होत असून या मुळे शहरातील नागरिकांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे , मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणामध्ये सध्या अत्यल्प प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असुन शहरातील नागरिकांना 22 ते 25 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. काल रात्री पासुन होत असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांची मात्र खराब रस्त्यांवरून चालतांना चांगली कसरत होत आहे.
अनेक दिवसांनंतर बरसलेला वरुण राजा असाच काही दिवस दमदार बरसत राहु दे आणि नदी-नाले पाण्याने तुडूंब भरून राज्यांतील दुष्काळ सदृश्य परिस्थिती लवकर नाहीशी होऊ दे , अशीच आशा वजा प्रार्थना सर्व नागरिक आणि शेतकरी वर्ग वरुण-राजाकडे करत आहे.