नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी, कसबे सुकेणे या स्थानकांचे रुपडे पालटणार
लासलगाव : राकेश बोरा
2027 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने आगाऊ तयारी सुरू केली असून, रेल्वेमार्गे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी 5 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी 1,011 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी नुकतीच या रेल्वे प्रकल्पाची सविस्तर आढावा बैठक घेतली. यामध्ये मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, भुसावळ विभागाचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाच प्रमुख स्थानकांचा समावेश
या सिंहस्थ आराखड्यात नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर प्रवासी सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली जाणार असून, स्टेशन्सची क्षमता वाढविण्यासाठी आणि गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी विस्तृत योजना तयार करण्यात आली आहे.
नाशिक रोड स्थानकासाठी प्रस्तावित कामे
प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ला दोन्ही दिशांनी वापरण्यायोग्य बनवले जाणार
प्लॅटफॉर्म क्रमांक १ चे २४ डब्यांच्या ट्रेनसाठी विस्तारीकरण
१२ मीटर रुंद नविन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) तयार होणार
माल शेडचा वापर ‘होल्डिंग एरिया’ म्हणून करण्याचा प्रस्ताव
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
रेल्वेने कुंभमेळ्यासाठी ‘एआय आधारित मॉनिटरिंग व कंट्रोल सिस्टम’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून भाविकांच्या हालचालींचे प्रभावी नियंत्रण करता येईल. यासाठी प्रयागराज महाकुंभ 2025 मधील यशस्वी कामकाज पद्धतींचा अवलंब करण्याचे निर्देश रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
स्थानिकांनाही होणार फायदा
या प्रकल्पामुळे सिंहस्थ काळात येणाऱ्या भाविकांना तर सुविधा मिळतीलच, पण नंतरही या परिसरातील रेल्वे सुविधांचा दर्जा उंचावणार असून, स्थानिक प्रवाशांनाही दीर्घकालीन फायदा होईल.
Comments are closed.