NGN News
Latest Marathi News

मालेगावी बोगस आधार केंद्रावर छापेमारी; चौघे जण ताब्यात

  • नाशिक स्थानिक गुन्हे शाखेकडून भांडाफोड

मालेगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहरात सुरु असलेल्या बोगस आधार केंद्राचा नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने भांडाफोड केला आहे. शहरातील इस्लामपुरा भागात ही कारवाई करण्यात आली असून यासंदर्भात चौघांना अटक करण्यात आली आहे. पूर्णपणे अनधिकृत असलेल्या या केंद्राच्या माध्यमातून तेलंगणामधील एका केंद्राचा आयडी वापरून आधारकार्ड तयार करण्याचे कारनामे येथे सुरु होते, अशी माहिती तपासात आढळून आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मालेगावमधील इस्लामपुरा भागात पठाण झेरॉक्स नामक दुकानात बोगस आधार केंद्र सुरु असल्याचा सुगावा नाशिक स्थानिक गुन्हे शाखेला लागल्यानंतर कारवाई करण्यात आली. या केंद्राला कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. नावे आधार तयार करण्यासह जुन्या आधारकार्डमध्ये आवश्यक ते बदल करून देण्याचे काम या केंद्रात बिनदिक्कतपणे सुरु होते. शिवाय ही कामे करताना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात होते. नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाई दरम्यान नायब तहसीलदार भूषण बोरसे हेदेखील उपस्थित होते. यावेळी संगणक, प्रिंटर आदींसह सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नायब तहसीलदार बोरसे यांच्या तक्रारीवरून नकीबउल्ला शरीफ ( तेलंगणा ) यासह रझिन अहमद, शकीन अहमद, मोमीन यहा गुलाम रसूल या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Comments are closed.