NGN News
Latest Marathi News

धक्कादायक खांदेपालट ! आ. राहुल ढिकले ‘आउट’, आ. देवयानी फरांदे ‘इन’

  • महापालिका निवडणूकप्रमुख पदाबाबत बदल
  • भाजपमधील गटबाजीचा परिपाक असल्याची चर्चा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महायुती असो किंवा नसो, महापालिकेत शंभरपेक्षा अधिक जागा मिळवण्याच्या दिशेने आगेकूच करत असलेल्या भाजपमधील एका घटनेने पक्षातील विसंगतीचा प्रत्यय दिला आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या आधी निवडणूकप्रमुख पदावर आ. राहुल ढिकले यांच्या नावाची घोषणा झालेली असताना अचानक त्यांना हटवून आ. देवयानी फरांदे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकीकडे पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना प्रदेश पातळीवरून करण्यात आलेला हा बदल किमान ढिकले समर्थकांना बुचकळ्यात टाकणारा ठरला आहे.

२०१७ मध्ये एकहाती सत्ता राखलेल्या भाजपला येनकेन प्रकारे नाशिकमध्ये यावेळीही कमळ फुलवायचे आहे. त्यादृष्टीने तयारी सुरु असताना हा अचानक बदल करण्यात आला. हा पक्षातील गटबाजीचा परिपाक असल्याचे मानले जात आहे. आ. ढिकले यांची आधी नियुक्ती करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच पुन्हा तसा बदल का केला, याबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्येच मोठी चर्चा रंगली आहे. वस्तुतः, शहरात देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले असे तीन भाजपचे आमदार असताना तीन टर्म निवडून आलेल्या फरांदे आणि हिरे यांना डावलून ढिकले यांच्याकडे निवडणूकप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. तेव्हाही खरेतर आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. आता निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपलेली असताना ढिकले यांना हटवून फरांदे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आल्याने तर्कवितर्क काढले जात आहेत.

निर्णय चव्हाण की महाजन यांचा ?

दरम्यान, निवडणूकप्रमुख पदावरून आ. ढिकले यांची गच्छंती करून त्यांच्याजागी आ. फरांदे यांना बसवण्याची खेळी नेमकी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची की कुंभमंत्री गिरीश महाजन यांची या चर्चेला उधाण आले आहे. हा फेरबदल असण्याऐवजी धक्कातंत्र असल्याचेही मानले जात आहे. तथापि, ऐनवेळी करण्यात आलेला हा बदल शहरभर चर्चेचा विषय बनला आहे.

‘ते’ वक्तव्य आले अंगलट ?

दोन दिवसांपूर्वी आ. राहुल ढिकले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणूकप्रमुख पदावर काम करताना आपण सर्व प्रभागांत हस्तक्षेप करणार नाही, तथापि आपल्याला व्यक्तिगत त्रास देणाऱ्या व्यक्तींना सोडणार नाही, असा गर्भित इशारा दिला होता. त्यांचा रोख नेमका कोणावर होता, हे स्पष्ट झाले नसले तरी निवडणूक काळात आ. ढिकले यांची rally अडवण्याचा प्रयत्न केलेल्यांना तो इशारा असल्याचे मानले जाते. बहुधा, त्यांचे हे वक्तव्य पदावरून गच्छंती होण्यास कारणीभूत ठरले, अशी अटकळ बांधली जात आहे.

महायुती अस्तित्वाला सुरुंग ?

या सगळ्या पार्शभूमीवर भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी एक वेगळाच बॉम्ब फोडला आहे. राज्यस्तरीय नेतृत्वाकडून महायुतीच्या गोष्टी केलाय जात असताना केदार यांनी, स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांची भुमिका २०१७ प्रमाणेच स्वतंत्र लढावे ही मागणी असल्याचे जाहीर केले आहे. भाजपकडे सर्व १२२ ठिकाणी सक्षम उमेदवार आहे. त्यामुळे युती करू नये या सर्वांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे कळविल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिल्याने नाशिकमधील प्रस्तावित महायुती अस्तित्वाला सुरुंग लागल्याचा अर्थ काढण्यात येत आहे.

Comments are closed.