** एनजीएन नेटवर्क
साधारणतः तीन वर्षांपूर्वी राजकीयदृष्ट्या सर्वार्थाने कूस बदललेल्या महाराष्ट्रात अवघे राजकीय पक्ष परस्परांवर चिखलफेक करण्यात मश्गुल असतानाच एका दाक्षिणात्य राज्यातील नेत्याने इथे दमदार ‘एन्ट्री’ करून स्थानिकांना घाम फोडला आहे. आठ वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशमधून स्वतंत्र झालेल्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी महाराष्ट्रावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला कंटाळलेल्यांसोबत ‘नेत्रपालवी’ करण्याचा सपाटा केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने लावला आहे. त्यामधील अनेकांना केसीआर यांच्या बहुचर्चित ‘तेलंगणा मॉडेल ऑफ गव्हर्नन्स’ची भुरळ पडली आहे. परिणामी, त्यापैकी बहुतेकांनी या नवख्या पक्षाच्या पालखीचे भोई बनण्यात समाधान मानले आहे. केसीआर यांच्या ‘मिशन महाराष्ट्र’ने केवळ विरोधकच नव्हे तर सत्ताधारीदेखील अस्वस्थ झाले आहेत.
महाराष्ट्रात पाय रोवू पाहणाऱ्या इतर राज्यांतील राजकीय पक्षांच्या रांगेत आता बीआरएसची भर पडली आहे. याआधी मायावतींचा बहुजन समाज पक्ष, मुलायमसिंह यांचा समाजवादी पक्ष, ओवेसी बंधूंचा एमआयएम, केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांनीही विस्ताराच्या दृष्टीने प्रयत्न केले. पैकी पहिल्या तीन पक्षांनी जातीय वा धार्मिक ध्रुवीकरणाची वात पेटवून धमाका करण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठी जनांना तो न रुचल्याने त्यांची वाढ आत्यंतिक मर्यादेत राहिली. दुसरीकडे केजरींचा ‘आप’ अंतर्गत लाथाळ्यांमुळे डोके काढतानाच धारातीर्थी पडला. तथापि, केसीआर एक विशिष्ट अजेंडा सोबत घेवून महाराष्ट्रात प्रवेशकर्ते झाले आहेत. आधी त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती हे प्रादेशिकतादर्शक नामाभिधान बदलून त्याला भारत राष्ट्र समिती असे स्वरूप देवून व्यापकता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात प्रस्थापितांच्या धोरणाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याची राजकीय खेळी केसीआर खेळताना दिसताहेत. त्यासाठी तेलंगणात कृषी क्षेत्रात केलेल्या अमुलाग्र सुधारणांचा ढोल वाजवण्यात ते कुठेही कसूर सोडताना दिसत नाहीये. या सुधारणाच त्यांच्या राज्याला विकासदरात देशात द्वितीय क्रमांकावर घेवून गेल्यात, हे सत्य ते महाराष्ट्रीय जनतेच्या गळी उतरवू पाहत आहेत. तेलंगणातील रयतु बंधू, मृदा आरोग्य कार्ड, बीज गाव कार्यक्रम, बीज ग्राम योजनांसह शेतीचे यांत्रिकीकरण या कृषी क्षेत्राशी संबंधित नव्या गोष्टी कानावर पडत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी केसीआर यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत आहे.
शेतकरी नेते शंकरराव धोंगडे, भगीरथ भालके आणि अन्य पक्षांतील माजी आमदार-नेते यांचे बीआरएसमध्ये दाखल होणे दखलपात्र ठरावे. तूर्तास प्रकाश आंबेडकरांचा बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम हे दोन पक्ष बीआरएस सोबत जाण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात त्यामध्ये आणखीही भर पडू शकते. केसीआर यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात राजकीय भवितव्य काय, हे येणारा काळ ठरवणार असला तरी त्यांच्या चंचुप्रवेशाची सत्तेतल्या युती आणि विरोधातील महाविकास आघाडीने चांगलीच दखल घेतली आहे. मोदी विरोधक म्हणून केसीआर यांच्यासाठी पायघड्या घालणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला अचानक साक्षात्कार झाला आणि त्यांनी बीआरएसवर तुटून पडण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे या पक्षाने निवडणुका उंबरठ्यावर असताना मराठी मुलखात प्रवेश केला आहे. इथला शेतकरी वर्ग केंद्रीभूत ठेवून सुरु केलेली वाटचाल हे त्यांचे बलस्थान ठरू शकते. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत सत्तेमध्ये वेगवेगळे पक्ष आले असले तरी त्याने शेतकऱ्यांचे भाग्य बदललेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या, शेतमालाला मातीमोल मूल्य आणि तत्सम बाबी या वर्गाच्या पाचवीला पुजल्या आहेत. मग उद्या केसीआर यांनी तेलंगणात यशस्वी करून दाखवलेल्या ‘गुणात्मक परिवर्तन’ अजेंड्याची भुरळ इथल्या बळीराजाला पडल्यास आश्चर्य वाटू नये. केसीआर यांनी त्यांच्या राज्यात कृषी क्षेत्रात आणलेल्या सुधारणा नक्कीच प्रभावित करणाऱ्या आहेत. आजवर यांना अनुभवले, एकदा बीआरएस अनुभवू, अशा मानसिकतेत शेतकरी आल्यास महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांची पंचाईत होवू शकते.
महाराष्ट्रात नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूरमध्ये सभा घेवून केसीआर यांनी त्यांच्या पक्षाची दिशा स्पष्ट केली आहे. सभेचे सोपस्कार पार पाडताना त्यांनी काही चांगले नेते गळाला लावले. लोकसभा, विधानसभा निवडणुकांत इच्छुक असलेले, मात्र ऐनवेळी डावलले गेल्यास अनेक बाशिंगवीर नवा, सक्षम पर्याय म्हणून बीआरएसच्या आश्रयाला जावू शकतात. या पक्षाला भले लगेचच मोठे यश प्राप्त होणार नाही, मात्र मतांच्या विभागणीस हातभार लावून त्यांचे उमेदवार एखाद्याचे ‘नशीब’ बदलण्याइतपत ‘उपद्रव मुल्य’ सिद्ध करू शकतात. त्याच अनुषंगाने केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला ‘पावसाळी छत्री’ अथवा ‘आरंभशूर’ अशी विशेषणे लावून स्वतःचे समाधान करून घेण्याची चूक महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांनी करू नये. वस्तुतः, केसीआर यांनी तेलंगणात अंगिकारलेला सुधारणावाद नेमका काय आहे, याचा तौलनिक अभ्यास करून त्यामधील कोणत्या गोष्टी आपल्याकडे लागू करणे व्यवहार्य ठरतील, यावर मंथन केलेले बरे राहील.
सारांशात, आठ वर्षांत तेलंगणात ‘करून दाखवलेल्या’ बीआरएसने महाराष्ट्रात शेतकरी वर्ग प्रमाण मानून त्यला आपल्याकडे आकृष्ट करण्याची खेळी खेळली आहे. यामुळे इथल्या राजकारण्यांचाही बुद्धिभेद झालाय, हे नाकारून चालणार नाही. प्रस्थापितांच्या कृषी धोरणाने अभ्युदय न झाल्याची सल उद्या बळीराजाला बीआरएसला कवेत घेण्यास उद्युक्त करण्यास कारणीभूत ठरली तर ते नवलाईचा भाग ठरू नये इतकेच !