NGN News
Latest Marathi News

असंघटित कामगारांना कामगार कायदा लागू करण्यासाठी बिल मांडा

खासदार राजाभाऊ वाजे यांची केंद्रीय कामगार मंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली | नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेऊन नाशिक व परिसरातील कामगारांच्या समस्या, गरजा आणि आरोग्य सेवांवरील मर्यादा यावर सखोल चर्चा केली. या चर्चेमध्ये त्यांनी कामगार हिताच्या अनेक महत्वाच्या विषयांवर ठोस भूमिका मांडत मंत्रालयाकडून तातडीची कार्यवाही करण्याची मागणी केली.

सिन्नर येथे प्रस्तावित असलेल्या नवीन ESIC रुग्णालयाच्या प्रगतीबाबत खासदार वाजे यांनी मंत्री मांडविया यांच्याकडे विशेष लक्ष वेधले. हजारो औद्योगिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना या रुग्णालयाचा मोठा लाभ होणार असून, या प्रकल्पास गती देण्यासाठी आवश्यक ते प्रशासनिक सहकार्य तात्काळ मिळावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

नाशिक शहरातील कार्यरत ESIC रुग्णालयात सध्या कर्मचारी टंचाई, वैद्यकीय उपकरणांची कमतरता तसेच पॅनलवरील खासगी रुग्णालयांचे प्रलंबित बिल यांसारख्या गंभीर अडचणी आहेत. या बाबींचा सविस्तर आढावा मंत्री महोदयांसमोर सादर करताना, खासदार वाजे यांनी या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यासोबतच, त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या २५० खाटांच्या नव्या ESIC रुग्णालयासाठी त्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले.

घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम क्षेत्रातील कामगार, हातमजूर यांसारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही ESIC, पीएफ आणि पेन्शनसारख्या सुविधा मिळाव्यात, यासाठी एक स्वतंत्र आणि समर्पित कायदा संसदेत मांडावा, अशी ठाम मागणी खासदार वाजे यांनी केली. विशेषतः महिलांमध्ये आर्थिक सुरक्षितता आणि आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकल्यानंतर मंत्री डॉ. मांडविया यांनी संबंधित विभागांशी तातडीने चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, नाशिक जिल्ह्याला अपेक्षित असलेल्या सेवा मिळवून देण्यासाठी मंत्रालय सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या केल्या मागण्या

  • असंगठित क्षेत्रातील महिलांसाठी नवे संरक्षणात्मक कायदे मागणीवर भर
  • नाशिकमधील सध्याच्या ESIC रुग्णालयाच्या अडचणी अधोरेखित
  • सिन्नर ESIC रुग्णालयासाठी गतीची मागणी

—————————–
कामगार हा देशाचा कणा आहे, तो सर्वच बाबतीत सुदृढ असेल तर देश देखील सुदृढ राहील. नाशिकमधील ESIC रुग्णालयाची खाट संख्या आपल्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे १०० वरून २५० झाली आहे. ग्रामीण भागासाठी सिन्नर येथे नवीन ESIC रुग्णालय उभारले जात आहे. याबाबत मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले. तसेच असंघटित कामगारांना देखील कामगार कायद्यानुसार सुविधा मिळाव्यात असा माझा सातत्याने आग्रह राहणार आहे.

  • राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

Comments are closed.