मुंबई/एनजीएन नेटवर्क
भाजपने शरद पवार यांना दोन मोठ्या पदांची ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्या माध्यमातून या दोन ऑफर्स देण्यात आल्या आहेत. भाजपच्या या खेळीमुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यासोबत अजित पवारांच्या ज्या भेटीगाठी वाढल्या आहेत, त्यामागे या ऑफर्सवरील चर्चा असल्याचंही सांगितलं जात आहे.
ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफर्सवर खुलासा केला आहे. तसे वृत्तच फ्रि प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. आपल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार यांना ही ऑफर देण्यात आली होती. जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामावून घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. अजितदादा हे नुकतेच दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांनी अजितदादांना शरद पवार यांना हा प्रस्ताव सांगण्यास सांगितल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे.