नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशकात भाईगिरी तसेच गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या रिल्स बनवणे आता महागात पडणार आहे. पोलिसांनी अशा प्रकारांचा बिमोड करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कुठल्याही सोशल मीडियावर अपलोड करताना दादागिरी भाईगिरी तसेच आव्हान-प्रती आव्हानाची भाषा असेल तर अशा डायलॉगबाजी अथवा प्रदर्शन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
यासाठी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर नाशिकचे सायबर सेल विशेष लक्ष देणार आहे. भाईगिरीच्या पोस्टला लाईक करणारे, कमेंट करणारे तसेच अशा भाईना फॉलो करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. आपल्याकडे सोशल मीडिया लॅब कार्यरत आहे. त्यात प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टची माहिती आपल्याकडे येते. काहीजण त्यावर भडकाऊ आणि चिथावणीखोर कमेंट करतात. त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
निर्णयाला ही पार्श्वभूमी..
काही दिवसांपूर्वी, नवीन नाशिकमध्ये एका बावीस वर्षीय भाजी विक्रेत्या युवकाची सहा युवकांनी हत्या केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर गुन्हेगार इंस्टावर लाईव्ह येतात. यातून पुढे आणखी गुन्हे घडतात. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.