NGN News
Latest Marathi News

सरसकट कर्जमाफी, विशेष आर्थिक पॅकेज द्या : करण गायकर यांची मागणी

  • छावा क्रांतिवीर सेनेतर्फे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्यात पडलेल्या ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे.या गंभीर परिस्थितीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या एक वर्षाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाबद्दल छावा क्रांतिवीर सेना तर्फे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मुंबईतील सेवा सदन निवासस्थानी महाजन यांचा सत्कार केला आणि त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी करण गायकर म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी,तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान अधिक झाले आहे अशा शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज देऊन दिलासा द्यावा.नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आपल्या वेतनाचा त्याग करून बळीराजासाठी दाखवलेली संवेदनशीलता ही महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींसाठी अनुकरणीय आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांना विनंती केली की त्यांनीही राज्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी ठोस निर्णय घ्यावा आणि जनतेच्या अपेक्षांनुसार उपाययोजना जाहीर कराव्यात.

या भेटीत महाजन म्हणाले की, “मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांच्या वेदना मला चांगल्या प्रकारे माहीत आहेत.आज बळीराजा संकटात असताना,त्याच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.बळीराजा जगला तरच हे राष्ट्र सुखाने जगेल,म्हणूनच मी माझे एक वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.”महाराष्ट्रातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने आपल्या परीने या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे,असेही त्यांनी आवाहन केले.

छावा क्रांतिवीर सेना ही संघटना नेहमीच शेतकरी, विद्यार्थी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी लढणारी संघटना आहे. संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले की, “आज गिरीश भाऊ महाजन यांनी दाखवलेला आदर्श हा केवळ प्रतीकात्मक नव्हे,तर प्रेरणादायी आहे.त्यांच्या या कृतीमुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून, राज्यातील जनतेने या संकटात एकजुटीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे.”या सत्कार सोहळा व देण्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यभरातून गिरीश महाजन यांच्या या निर्णयाचे कौतुक होत असून, “हीच खरी जनसेवा आणि माणुसकी” असा सूर महाराष्ट्रभर उमटत आहे.

Comments are closed.