नाशिक/एनजीएन नेटवर्क
देशभर चर्चेत असलेला समान नागरी कायदा सर्व धर्मातील स्त्री-पुरूषांसाठी दत्तक विधान, मालमत्ता, विवाह यादृष्टीने आत्यंतिक महत्वाचा असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले. नाशिक दौऱ्यात डाॅ. नीलम गोऱ्हे प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होते, त्यानुसारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा गाडा हाकत आहेत. त्याच अनुषंगाने आपण शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी डाॅ. गोऱ्हे नाशिक दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उध्दव ठाकरे यांनी समान नागरी कायद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यासंदर्भात त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली असता त्यांनी कायद्याचा अंतिम मसुदा आल्यावर बोलू, असे सांगितले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समान नागरी कायद्याविषयी वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली होती, याकडे डाॅ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले.
शिंदे बेरजेचे राजकारण करणारे नेते
@मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बेरजेचे राजकारण करीत आहेत. सत्ता एक साधन आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने आमदार अस्वस्थ असले तरी राजकारणात प्रत्येकाची तयारी असते, असे गोऱ्हे यांनी नमूद केले. शिंदे गटात गेल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकचा दौरा झाला. गोऱ्हे यांचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. त्याविषयी लोकशाही असून प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.