NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

लोकसभेसाठी लगीनघाई सुरु ! (सारीपाट/मिलिंद सजगुरे)

0

** एनजीएन नेटवर्क

       रेंद्र मोदी यांच्या जादुई नेतृत्वाने दोन सार्वत्रिक निवडणुका लिलया जिंकणाऱ्या भाजपला तोच चमत्कार तिसऱ्यांदा घडवायचा आहे. आगामी निवडणुका काही महिन्यांवर असताना म्हणूनच भाजपेयी ‘एक्शन मोड’मध्ये आले आहेत. एक-एक जागा महत्वाची असल्याने ती जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे पक्षाचे धोरण आहे. यासाठी महाराष्ट्रापुरते ‘मिशन ४५’ ठरवण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने केंद्र-राज्यातील शीर्षस्थ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यभर जोर-बैठकांचे सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्यात लोकसभेची अडीच क्षेत्रं आहेत. त्यावर वर्चस्व कायम ठेवण्याच्या दृष्टीने पक्षाने कंबर कसली आहे. दुसरीकडे भाजपची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी विरोधक ऐक्याची वज्रमूठ आवळण्याच्या तयारीत आहेत.

     नाशिक लोकसभा मतदारसंघ युती धोरणात शिवसेनेच्या वाटेला गेला आहे. सलग दोन निवडणुकांत सेनेच्या हेमंत गोडसे यांनी विक्रमी मताधिक्याने विजयश्री प्राप्त केली. अलीकडील घडामोडीत गोडसे शिवसेनेच्या शिंदे गटासोबत जोडले गेले. स्वाभाविकच त्यांची तिसऱ्यांदा दावेदारी राहील. त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. तथापि, येवू घातलेल्या निवडणुकीत सर्व परिस्थिती गोडसे यांना अनुकूल राहण्याची शक्यता धूसर असल्याचे म्हटले जाते. एकतर नाशिकची जागा शिंदे गटाकडे असावी की नाही, यावर भाजपमध्ये खल सुरु आहे. तडजोडीत ही जागा आपल्याकडे खेचण्याची भाजपची छुपी रणनीती अलीकडील घडामोडींवरून अधोरेखित होत आहे. गोडसे यांना ‘एन्टी इन्कमबन्सी’चा फटका बसू शकतो आणि शिवसेनेच्या शिंदे गटात लोकसभेपुरता दुसरा दमदार चेहरा नाही, असा मुद्द्दा भाजप पुढे रेटण्याची शक्यता आहे. तुलनेत लोकसभा मतदारसंघात तीन ठिकाणी भाजप आमदार आहेत; शिवाय, मोदी यांच्या नेतृत्वाची जादू, महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी या बाबी भाजपच्या दाव्याला पूरक ठरू शकतात. भाजपकडे एक नव्हे तर तीन ते चार चेहरे उमेदवारीसाठी पात्र असल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सीमा हिरे आणि डॉ. राहुल आहेर या आमदारद्वायींसह नुकत्याच पक्षात आलेल्या आर्की. अमृता पवार यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे.

  भाजप-शिवसेनेइतकीच अनिश्चितता महाविकास आघाडी उमेदवाराबाबत राहणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचा केवळ चर्चा घडवून आणण्यापुरता नाशिकवर दावा दिसून येतो. पक्ष संघटनेतील विकलांगता लक्षात घेता कॉंग्रेस तशी मागणीदेखील करण्याची शक्यता नाही. या परिस्थितीनुरूप नाशकातील लढत भाजप (अथवा शिवसेना शिंदे गट) विरुध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस अशीच होण्याची शक्यता आहे. सलग दोन निवडणुकांत पराभव झाल्याने भुजबळ काका-पुतणे यांच्यापैकी कोणी लोकसभेच्या मैदानात उतरणे तूर्तास शक्यतेपलीकडे वाटते आहे. म्हणूनच उमेदवारीची माळ सिन्नरचे आ. माणिकराव कोकाटे यांच्या गळ्यात पडल्यास नवल नाही. आ. कोकाटे यांनी गेल्यावेळी अपक्ष उमेदवारी करून लोकसभेची रंगीत तालीम अनुभवली आहे. म्हणूनच ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यास रंगत निर्माण होवू शकते.       

             दिंडोरीमध्ये पवार कुटुंबियांत लढत ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपच्या कमळावर स्वार होत थेट केंद्रीय राज्यमंत्री पदावर विराजित झालेल्या डॉ. भारती पवार ह्याच अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवार राहतील याबाबत कोणाच्याही मनात शंका नसावी. या मतदारसंघात चांदवड-देवळ्यात भाजप, दिंडोरी-पेठ, कळवण-सुरगाणा, निफाड, आणि येवल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि नांदगावमध्ये शिवसेना शिंदे गट अशा आमदारकीच्या सुभेदाऱ्या वाटल्या गेल्या आहेत. विधानसभेत निकाल काहीही लागो, पण दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आजवर केवळ भाजपला कौल मिळाला आहे.

आगामी निवडणुकीत डॉ. भारती पवार यांच्यासमोर कोण उभे ठाकणार एव्हढेच औत्सुक्य असणार आहे. डॉ. पवार यांना टक्कर देवू शकेल असे एकमेव म्हणून दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे नाव पुढे येत आहे. तथापि, आ. झिरवाळ यांनी २००९ मध्ये नशीब अजमावले आहे. मात्र पराभव वाट्याला आल्याने आपली विधानसभाच बरी म्हणून ते यावेळीही अंग काढण्याच्या मनस्थितीत असल्याचे कळते. याच पार्श्वभूमीवर कळवण-सुरगाण्याचे आ. नितीन पवार यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांचे नाव पुढे आले आहे. तसे झाल्यास सख्ख्या जावा समोरासमोर येवून राज्यातील ‘हाय व्होल्टेज’  लढतींच्या यादीत ती पोहचेल, यामध्ये शंका नाही.     

            धुळ्यात भूसेंची प्रतिष्ठा लागणार पणाला

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात बागलाण, मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य ही विधानसभेची तीन क्षेत्रं येतात. भुसे यांच्याविरोधात हिरे घराण्याने पुन्हा शड्डू ठोकले आहे. अद्वय हिरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करून भुसे यांच्यापुढे आव्हान उभे केल्याने लोकसभा निवडणूक दोहोंसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. भुसे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. स्वाभाविकच त्यांच्या कामगिरीकडे राज्यातील नेतृत्वाचे लक्ष लागून राहणार आहे. लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी ‘लिटमस चाचणी’ ठरणार आहे.

 महाविकास आघाडीचा विचार करता ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला येते. अद्वय हिरे यांनी या मतदारसंघात बाह्या सावरल्या आहेत. घराण्याच्या पुण्याईला डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधातील ‘एन्टी इन्कमबन्सी’ची बाब आणि मुस्लीम मतांची लक्षणीय संख्या यांची जोड मिळाल्यास हिरे राजकारणात पुन्हा ‘चमक’ प्राप्त शकतात, असे आडाखे मांडले जात आहेत. तसे झाल्यास इथली लढत युती विरुद्ध आघाडी अशी होण्यापेक्षा भुसे विरुध्द हिरे अशीच होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये हिरे वरचढ ठरल्यास आपल्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लागण्याचा तो श्रीगणेशा असेल, याची भुसे यांना पुरेपूर जाणीव आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी ती आयुष्यातील निर्णायक निवडणूक ठरेल. अर्थात, कॉंग्रेसने या जागेवरील हक्क सोडला तरच हे शक्य आहे, हेदेखील तितकेच खरे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.