धुळे/एनजीएन नेटवर्क
गर्भवती महिलेला चक्क बांबूंना फडके बांधून त्याची झोळी करुन तीन किलोमीटर अंतरावरील आरोग्य केंद्रात दाखल होण्याचे भोग एका महिलेच्या वाटेला आले आहेत. शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थुवानपाणी येथील या घटनेने संताप व्यक्त करण्यात येत आहे. लालबाई मोतीराम पावरा असे संबंधित महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या थुवानपाणी व निशाणपाणी या दुर्गम क्षेत्रांत ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होतात. पक्का रस्ता नसल्याने येथे रुग्णवाहिका पोहोचत नाही. यामुळे सदर महिलेला निशाणपाणी ते थुवाणपाणी आणि परत असे एकूण सहा किलोमीटरचा रस्ता झोळीत पार करण्यात आला. त्यानंतर तेथून या महिलेला गुऱ्हाळपाणी येथून अंबुलन्सने वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रसूती होऊन बाळ व त्या महिलेची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. तथापि, गर्भवती महिलेच्या वाटेला आलेल्या या भोगानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून यापुढे तरी प्रशासन जागे होईल का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.