- राजीनाम्याचा निर्णय मागे; वरिष्ठांशी बोलणे झाल्याचा निर्वाळा
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
उपमहापौर निवडणुकीत निष्ठा आणि ज्येष्ठत्व नाकारल्याच्या कारणावरून राजीनामास्त्र उपसलेल्या शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी अखेर तलवार म्यान केली आहे. दस्तुरखुद्द, पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्याने आपण महानगरप्रमुख आणि नगरसेवक पदांवर कायम राहणार असल्याचे तिदमे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेत निर्माण होऊ पाहणारे वादळ चहाच्या प्याल्यातील ठरले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्यानंतर महापौर-उपमहापौर निवडणुकीत मात्र दोन्ही पक्ष एकत्र आलेत. भाजपने शिवसेनेला उपमहापौरपद देवू केल्यानंतर निष्ठा आणि ज्येष्ठत्व या मुद्द्यांवर ते आपल्याला मिळणे अपेक्षित असतना तुलनेत पक्षात उशिरा आलेल्या विलास शिंदे यांना दिल्याचा आरोप करीत महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी पदासह नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची अनपेक्षित घोषणा केली होती. पक्षाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्यासह विलास शिंदे यांच्यावर तिदमे यांनी टीकास्त्रही सोडल्याने पक्षातील बेदिली चव्हाट्यावर आली. त्यानंतर तिदमे ‘नॉट रिचेबल’ झाल्याने आणखीच गोंधळ वाढला. तथापि, सोमवारी माध्यमांसमोर येत तिदमे यांनी आपले एकनाथ शिंदे यांसह वरिष्ठांशी बोलणे झाले असून आता समाधानी असल्याचे सांगत राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या ‘यु टर्न’मुळे पक्षांतर्गत वाद तूर्तास शमला आहे.
Comments are closed.